वृत्तसंस्था/ उज्जैन
इंदोर-नागपूर वंदे भारत एक्स्प्रेसवर अज्ञात व्यक्तींकडून दगडफेक करण्यात आली आहे. उज्जैन विभागातील चिंतामण स्टेशन ते उज्जैन दरम्यान सकाळी 6.50 वाजता रेल्वेवर दगडफेक करण्यात आल्यामुळे कोच क्रमांक सी-6 आणि सी-7 च्या काचा फुटल्या. या घटनेनंतर आरपीएफने याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
इंदोरहून भोपाळला जाणारी वंदे भारत एक्स्प्रेस पाच दिवसांपूर्वी इंदूरहून नागपूरला हलवण्यात आली होती, मात्र गेल्या दोन दिवसांपासून या गाडीवर सातत्याने दगडफेक सुरू आहे. गाडी क्रमांक 20911 इंदूर-भोपाळ वंदे भारत एक्स्प्रेस 9 ऑक्टोबरपासून नागपूरपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून एक्स्प्रेसवर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत दोन डब्यांच्या काचा फुटल्याने एक्स्प्रेसमधील प्रवासी घाबरले. चिंतामण स्टेशन ते उज्जैन दरम्यान सलग दुसऱ्या दिवशी असा प्रकार घडल्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करून गुन्हा दाखल करण्यात आला असून सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण व्यवस्था करण्यात येईल, असे रेल्वे पोलिसांकडून सांगण्यात आले.









