महामार्ग रोखून आंदोलन : जिल्हा पोलीस प्रमुख-शेतकरी नेत्यांच्या आवाहनानंतर आंदोलन मागे
वार्ताहर/यमकनमर्डी
गेल्या 10 दिवसांपासून शेतकरी संघटनेने गुर्लापूर, हुक्केरी, चिकोडी, पाश्चापूर, संकेश्वर, अथणी इत्यादी भागात उसाला प्रतिटन 3500 रुपये दर मिळावा, या मागणीसाठी आंदोलन छेडले आहे. पण दर देण्याविषयी सरकार व कारखानदारांनी कोणताच निर्णय घेतलेला नाही. या निषेधार्थ शुक्रवारी हत्तरगी टोलनाक्यानजीक राष्ट्रीय महामार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या आंदोलनादरम्यान महामार्गावर वाहनांवर दगडफेकीचा प्रकार घडला. दरम्यान जिल्हा पोलीसप्रमुख आणि हसीरु शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष चुनाप्पा पुजारी यांच्या आवाहनानंतर सदर आंदोलन मागे घेण्यात आले. यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू झाली.
गुरुवारी सकाळी 10 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत राष्ट्रीय महामार्गावर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. यामुळे रस्त्याच्या दुतर्फा व महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहने थांबून होती. पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गावर आंदोलकांना स्थानिक रस्त्याच्या दिशेने हटवले. शांततेने आंदोलन छेडत असतानाच दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी आंदोलकांची धरपकड सुरू करताच संतापलेल्या आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांवर दगडफेक सुरू केली. यामुळे राष्ट्रीय महामार्गावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. भिमाशंकर गुळेद व हसीरु शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष चुनाप्पा पुजारी यांनी आंदोलनाच्या ठिकाणी भेट देऊन आंदोलकांना विश्वासात घेत 10 तारखेपर्यंत सरकारने दरवाढी संदर्भात ग्वाही दिली असून तोपर्यंत आंदोलन मागे घेण्याची सूचना दिली.
आंदोलकांनी पुजारी यांच्या सूचनेचे पालन करत आंदोलन मागे घेतले. यावेळी पोलिसांनी वाहतुकीसाठी महामार्ग खुला केला. दरम्यान सदर आंदोलन मागे घेण्यात आल्याने तब्बल 5 तासानंतर वाहतूक पूर्ववत सुरू झाल्यामुळे वाहनधारकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. या आंदोलनात विविध शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, ऊस उत्पादक शेतकरी, माजी सैनिक, हुन्सीकोळ मठाचे सिद्धबसव स्वामीजी, हत्तरगी कारी मठाचे गुरुसिद्ध स्वामीजी यांच्यासह व्यापाऱ्यांनीही या आंदोलनाला पाठिंबा देत सक्रिय सहभाग घेतला होता. दरम्यान आंदोलकांनी दगडफेक केल्याने काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिणामी आंदोलक 3500 रुपये दरावर ठाम असून निर्णयाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.









