कोट्यावधी वर्षे जुने अचंबित करणारे दृश्य
चीनच्या युनान प्रांतात एक अनोखे जंगल आहे. येथे कुठलेही झाडांचे जंगल नसून पर्वत अन् दगडांचे जंगल आहे. हे अनोखे जंगल पाहण्यासाठी मोठ्या संख्येत पर्यटक पोहोचत असतात. भूगर्भीय प्रक्रियांमुळे या अजब जंगलाची निर्मिती झाल्याचे सांगण्यात येते. 349 किलोमीटरपर्यंत फैलावलेले हे जंगल सुमारे 27 कोटी वर्षांपूर्वी निर्माण झाल्याचे समजते. येथील खडकांची काही शिखरं सुमारे 40 मीटरपर्यंतच्या उंचीची आहेत. वैज्ञानिकांनुसार येथे पूर्वी सुमारे 2670 चौरस किलोमीटर क्षेत्रात फैलावलेला समुद्र होता.
चीनच्या युनान प्रांतात 180 चौरस मैलाहून अधिक क्षेत्रात शिलिन स्टोन फॉरेस्ट फैलावलेले आहे. याला जगातील पहिले नैसर्गिक आश्चर्य संबोधिले जाते, कारण हे जंगल लाखो वर्षांपासून पाऊस, वारा अन् भूगर्भीय हालचालींमुळे आपोआप तयार झालेले आहे.
चीन सरकारने 1950 च्या दशकात पहिल्यांदा हे जंगल पर्यटकांसाठी खुले गेले आणि तेव्हापासून हे देशातील सर्वात लोकप्रिय आकर्षणांपैकी एक आहे. हे सुमारे 27 कोटी वर्षे जुने जंगल आहे. हे जंगल दक्षिण चीन कार्स्ट नावाने ओळखल्या जाणाऱ्या क्षेत्राचा हिस्सा आहे. शिलिन अनेक छोट्या दगडांच्या जंगलांमध्ये विभाजित असून यात गुहा, झरे, तलाव, एका बेटासमवेत एक सरोवर अन् एक भूमिगत नदी देखील आहे.
हे पूर्ण क्षेत्र दगडांच्या शिखरांनी तयार झालेले आहे. येथील खडकाळ शिखरांचा रंग एकप्रकारचा स्टील-ग्रे आहे. सर्वात उंच खडकाचे शिखर 40 मीटरपेक्षा अधिक उंचीचे असू शकते. दगडांच्या या जंगलावरून अनेक कहाण्या देखील प्रचलित आहेत.