वृत्तसंस्था /चेन्नई
इंग्लंडचा हुकमी अष्टपैलू बेन स्टोक्स 2024 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत खेळू शकणार नाही, अशी माहिती चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या फ्रांचाईजीने दिली आहे. 2023 च्या आयपीएल हंगामात बेन स्टोक्सने चेन्नई सुपर किंग्ज संघाचे प्रतिनिधीत्व केले होते. पण तो केवळ 2 सामने खेळू शकला होता. गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे स्टोक्सला अनेक महत्त्वाच्या स्पर्धांना मुकावे लागले आहे. तंदुरूस्तीच्या समस्येमुळे आपण 2024 च्या आयपीएल स्पर्धेत खेळू शकणार नाही, असे स्टोक्सने चेन्नई सुपर किंग्जच्या व्यवस्थापन समितीला कळविले आहे. 2024 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेपूर्वी भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. तसेच 2024 च्या जूनमध्ये विंडीज आणि अमेरिका यांच्या संयुक्त यजमानपदाने आयसीसीची टी-20 विश्चचषक क्रिकेट स्पर्धा घेतली जाणार आहे. नुकत्याच झालेल्या विश्चचषक क्रिकेट स्पर्धेत माजी विजेत्या इंग्लंड संघाची कामगिरी अत्यंत खराब झाली होती. या संघाला सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. या स्पर्धेमध्ये स्टोक्सने एक शतक आणि दोन अर्धशतके नोंदविली. पण तो या स्पर्धेतील सहा सामन्यापैकी एकाही सामन्यात गोलंदाजी करु शकला नव्हता.









