वृत्तसंस्था/ केर्न्स
रविवारी येथे खेळविल्या जाणाऱया न्यूझीलंड विरुद्ध तिसऱया आणि शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू स्टोनिस आणि वॉर्नर उपलब्ध राहणार नाहीत असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या प्रवक्त्याने सांगितले. ऑस्ट्रेलियन संघात नॅथन ईलिसचा समावेश करण्यात आला.
या मालिकेतील हा शेवटचा औपचारिक सामना असून ऑस्ट्रेलियन संघ न्यूझीलंडला व्हाईटवॉश देण्यासाठी सज्ज झाला आहे. या मालिकेतील दुसऱया सामन्यात स्टोईनिसने केवळ तीन षटके गोलंदाजी केली आणि फलंदाजीत तो केवळ 6 चेंडूंना सामोरे जात लवकर बाद झाला. ऑस्ट्रेलियाने हा दुसरा सामना 113 धावांनी जिंकला होता. स्टोईनिसला स्नायू दुखापत झाली असून तो दुसऱया सामन्यात क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उपलब्ध होऊ शकला नाही. सलामीच्या वॉर्नरला अलीकडील कालावधीत वारंवार दुखापतीच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ पुढील आठवडय़ात भारताच्या दौऱयावर येणार असून या दौऱयात उभय संघात टी-20 मालिका खेळविली जाणार आहे. या मालिकेसाठी वॉर्नर उपलब्ध राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
ऑस्ट्रेलियन संघ – ऍरॉन फिंच (कर्णधार), सीन ऍबॉट, ऍगेर, कॅरे, ग्रीन, हॅझलवूड, लाबुशेन, मार्श, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्ह स्मिथ, स्टार्क, झाम्पा.









