जनार्दन भंडारी, विकास भगत यांचा आरोप : उच्चपदस्थ राजकीय व्यक्ती गुंतल्याचा दावा
प्रतिनिधी / काणकोण
तामणे, काणकोण येथील सरकारी सुतारकाम प्रशिक्षण आणि उत्पादन केंद्राजवळ अंदाजे 5 ट्रक इतका बेकायदेशीररीत्या कापण्यात आलेल्या लाकडाचा साठा साठविण्यात आला असून त्यातील काही लाकूड चिरण्यात आले आहे, तर काही लाकूड अजून चिरण्याचे बाकी आहे. हे सर्व लाकूड खोतीगावच्या जंगलातून बेकायदेशीररीत्या कापण्यात आलेले आहे आणि त्याचा वापर इमारत बांधकामासाठी करण्यात येणार आहे. मात्र एवढ्या प्रचंड प्रमाणात साठविलेल्या लाकडाचा अधिकृत परवाना नसून यात एका उच्चपदस्थ राजकीय व्यक्तीचा आणि वनाधिकाऱ्यांचा हात आहे, असा आरोप या केंद्राची आणि तेथे साठवून ठेवलेल्या लाकडाच्या साठ्याची पाहणी केल्यानंतर काँग्रेसच्या जनार्दन भंडारी आणि गोवा फॉरवर्डच्या विकास भगत यांनी केला.
तत्कालीन मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांनी स्थानिक सुतारांना रोजगार मिळावा आणि नवीन कारागीर तयार व्हावेत या उद्देशाने या केंद्राची उभारणी केली होती. या सरकारी सुतारकाम प्रशिक्षण केंद्रात खासगी जमिनीवरील एखादे कापलेले लाकूड चिरायचे असेल, तर वन खात्याकडून अधिकृत परवाना मिळविण्याची आवश्यकता असते. शिवाय दिलेला परवाना आणि चिरण्यासाठी आणलेले लाकूड यात तफावत असता कामा नये. असे असताना आणि वन खात्याचा परवाना नसताना लाकूड चिरून घेण्यामागे राजकीय व्यक्ती गुंतलेली असून वनाधिकाऱ्यांशी यासंबंधी बोललो असल्याचे सांगण्यात आल्यामुळे आपण केवळ दबावामुळे हे काम केले असल्याचे स्पष्टीकरण या केंद्राच्या प्रमुखाने दिलेले आहे, असा दावा भंडारी व भगत यांनी केला.
हे लाकूड साधारणपणे पाच दिवसांपूर्वी खोतीगाव अभयारण्यातून चोरून या ठिकाणी आणले असावे. सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून ज्या राजकीय व्यक्तीने हे कृत्य केलेले आहे त्याची संपूर्ण चैकशी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि वनमंत्र्यांनी करावी, अशी जोरदार मागणी भगत यांनी केली.
दरम्यान, यासंबंधी काणकोणचे वनाधिकारी आनंद मेत्री यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, यातील बरीच झाडे पाऊस, वादळी वाऱ्याच्या माऱ्याने पडलेली आहेत. अशा झाडांचा वनखाते वर्षातून एकदा लिलाव करत असते. मात्र तातडीने लाकडाची आवश्यकता असल्याचे सांगून संबंधितांनी 24 एप्रिल रोजी काही रक्कम वन खात्यामध्ये भरून हे लाकूड हलविले. प्रत्यक्षात त्याचा लिलाव झालेला नाही. त्यामुळे लिलाव न करता झाडे हलविण्यात आल्यामुळे त्यांना दंड ठोठावण्यात येणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.









