वृत्तसंस्था / बिजिंग
अमेरिकेकडून चीनच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर विक्री निर्बंध लादले जाण्याची शक्यता आहे. हा निर्णय लवकरच होईल असे बोलले जाते. त्यामुळे अनेक चीनी कंपन्यांनी सॅमसंग या दक्षिण कोरियाच्या कंपनीच्या मायक्रोचिप्सचा साठा करुन ठेवण्याचा सपाटा लावला आहे, अशी माहिती समोर येत आहे.
इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातली बडी चीनी कंपनी हुवेई आणि दुसरी एक मोठी कंपनी बैदू तसेच त्या देशातील अनेक स्टार्टअप कंपन्यांनी सॅमसंगच्या उच्च बँडविड्थ मेमरीच्या चिप्स (सेमीकंटक्टर्स) साठवून ठेवण्यास प्रारंभ केला आहे. अमेरिकेकडून चीनच्या उत्पादनांवर विक्री निर्बंध लादले जाण्याची शक्यता गृहित धरुन ही उपाययोजना करण्यात येत आहे. अमेरिकेने निर्बंध घातलेच, तर सॅमसंग या कंपनीकडून अमेरिकेला किंवा जगाला चिप्सचा भरपूर पुरवठा केला जाऊ नये, म्हणून हा साठा करुन ठेवण्यात येत आहे, असे तज्ञांचे मत आहे.
कृत्रिम बुद्धीमत्ता चिप्सचीही खरेदी
चीनी कंपन्यांनी जगाच्या बाजारपेठांमधून मोबाईल प्रमाणेच, कृत्रिम बुद्धीमत्तेशी संबंधित चिप्सचीही जोरदार खरेदी करण्यास प्रारंभ केला आहे. या वर्षाच्या प्रारंभापासूनच चीनने हा साठा करण्यास प्रारंभ केला आहे. सॅमसंगच्या उत्पादनाच्या साधारणपणे 30 टक्के साठा चीनच खरेदी करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या खरेदीचा दुसरा उद्देश चीनमध्ये, अमेरिकेच्या निर्बंधांनंतरही सेमीकंटक्टर्सचा तुटवडा पडू नये, असा असल्याचे मत काही जाणकारांनी व्यक्त केले. जगाच्या सेमीकंटक्टर बाजारपेठेवर नियंत्रण मिळविण्याची चीनची महत्वाकांक्षा आहे.
अमेरिका का निर्बंध घालणार आहे…
अमेरिकेतही सध्या चीननिर्मित मायक्रोचिप्सचा सुळसुळाट आहे. मात्र, चीन या चिप्सच्या माध्यमातून हेरगिरी करत आहे, असा आरोप केला जातो. त्यामुळे अमेरिकेच्या सुरक्षेसाठी चीनच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि सेमीकंडक्टर्सवर बंदी घालण्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ बायडेन यांनी काही महिन्यांपूर्वी केली होती. परिणामी चीनने ही पूर्वतयारी करण्यास प्रारंभ केला आहे.









