वृत्तसंस्था / दार्जिलींग
तृणमूल काँग्रेसच्या एका महिला नेत्याच्या पतीकडून अत्यंत दुर्मिळ अशा किरणोत्सारी धातूचा साठा जप्त करण्यात आला आहे. या धातूचा उपयोग अणुबाँब तयार करण्यासाठी केला जातो, अशी माहिती देण्यात आली. या धातूची किंमत तब्बल 17 कोटी रुपये प्रतिग्रॅम अशी आहे, असे तज्ञांनी स्पष्ट केले आहे.
तृणमूल काँग्रेस पक्षाच्या नेत्या अमृता एक्का यांचे पती फ्रान्सिस एक्का यांच्याकडे या धातूचा साठा आढळून आला आहे. ही कारवाई पश्चिम बंगाल पोलीस आणि राष्ट्रीय आपत्तीनिवारण दलाने संयुक्तरित्या केली. या धातूचे नाव कॅलिफोर्नियम असे असून तो पृध्वीच्या गर्भात अत्यंत कमी प्रमाणात सापडतो. हा धातू या नेत्याच्या पतीपाशी कसा आला यासंबंधी आश्चर्य व्यक्त केले जात असून या संदर्भात फ्रान्सिस एक्का याची कसून चौकशी केली जात आहे. एक्का याच्याकडून डीआरडीओ या संरक्षण संशोधन संस्थेची काही महत्वाची कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. एक्का याच्याजवळ किती प्रमाणात हा धातू सापडला याची माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, तो त्याच्याजवळ आलाच कसा हाच प्रश्न आता महत्वाचा ठरत आहे.









