सेन्सेक्स 73 अंकांनी घसरणीत, एचडीएफसी बँक तेजीत कोटक घसरणीत
वृत्तसंस्था/ मुंबई
आठवड्याच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअर बाजार घसरणीसोबत बंद झाला आहे. ऑटो निर्देशांक वगळता इतर सर्व क्षेत्रांचे निर्देशांक घसरणीत राहिले होते. एचडीएफसी बँकेचे समभाग सर्वाधिक वधारलेले दिसून आले.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 73 अकांनी घसरुन 81151 अंकावर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 72 अंकांनी घसरुन 24781 अंकांवर बंद झाला होता. सोमवारी दिवसभरामध्ये शेअर बाजारात चढउतार पहायला मिळाला. सुरुवातीच्या सत्रामध्ये निफ्टी 100 अंक तेजीसमवेत 24956 अंकांवर खुला झाला होता. दुसरीकडे सेन्सेक्स निर्देशांकसुद्धा 500 अंकांच्या तेजीसोबत 81770 अंकांवर खुला झाला होता. काही वेळानंतर मात्र बाजारात घसरण दिसून आली. विविध समभागांच्या कामगिरीचा विचार करता एचडीएफसी बँकेचे समभाग सर्वाधिक तेजीत पहायला मिळाले. एचडीएफसी बँकेचे समभाग सोमवारी 2.79 टक्के वाढत 1729 रुपयांवर बंद झाले. यासोबत एशियन पेंटसचे समभाग 1.91 टक्के वाढत 3049 रुपयांवर, महिंद्रा आणि महिंद्राचे समभाग 1.15 टक्के वाढत 2998 रुपयांवर बंद झाले. टेक महिंद्राचे समभाग 0.79 टक्के वाढत 1701 रुपयांवर आणि रिलायन्सचे समभाग 0.73 टक्के वाढत 2738 रुपयांवर बंद झाले होते.
हे समभाग घसरले
दुसरीकडे कोटक बँकेचे समभाग सोमवारी मोठ्या प्रमाणात घसरणीत होते. बँकेचे समभाग 4.38 टक्के घसरत 1789 रुपयांवर बंद झाले. या सोबतच बजाज फिनसर्व्हचे समभाग 3.38 टक्के घसरत 1758 रुपये, इंडसइंड बँक 2.90 टक्के घसरत 1308 रुपये, अदानी पोर्टस्चे समभाग 2.15 टक्के घसरत 1376 रुपयांवर बंद झाले होते. विविध निर्देशांकाच्या कामगिरीचा विचार केल्यास ऑटो निर्देशांक 0.42 टक्के वाढत 25252 अंकांच्या स्तरावर बंद झाला. बँक निफ्टी 0.25 टक्के घसरत 51963 अंकावर, आयटी निर्देशांक 1.29 टक्के घसरत 41563 च्या स्तरावर बंद झाला.
दिवाळी मुहूर्त ट्रेडिंग 1 नोव्हेंबरला
पुढील आठवड्यात दिवाळीचा सण साजरा होत असून शेअर बाजारात यानिमित्ताने खास सत्राचे आयोजन केले जाणार आहे. दिवाळी मुहूर्त ट्रेडिंग 1 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6 ते 7 या वेळेमध्ये विशेष सत्र आयोजित केले जाणार असल्याची माहिती बीएसई-एनएसई यांनी दिली आहे.








