वृत्तसंस्था/ मुंबई
आंतरराष्ट्रीय बाजारात दबावाचे वातावरण असतानाही सोमवारी आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअर बाजार वधारासह बंद होण्यात यशस्वी झाला आहे. यात फार्मा क्षेत्रातील कंपनी सन फार्मा व एफएमसीजी कंपनी आयटीसीचे समभाग सर्वाधिक फायद्यात होते.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 442 अंकांच्या वधारासह 59,245 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी निर्देशांकाने 126 अंकांनी वाढत 17,665 अंकांचा टप्पा पार केला होता. सेन्सेक्समधील 30 पैकी 23 समभाग तेजीसह बंद झाले. सन फार्मा, आयटीसी, एनटीपीसी आणि रिलायन्स यांचे समभाग सर्वाधिक वधारलेले दिसले तर दुसरीकडे नेस्ले, अल्ट्राटेक सिमेंट, विप्रो, एशियन पेंट्स आणि एचयुएल यांचे समभाग नुकसानीत होते. महागाईचा स्तर जागतिक स्तरावर वाढलेला असून त्याचे काहीसे परिणाम बाजारावर जाणवत होते. अमेरिकेत फेडरल बँक आगामी पतधोरण बैठकीत 50 ते 75 बेसीस पॉइंटस्ने व्याजदर वाढवण्याचे संकेत आहेत. तिकडे ओपेकची बैठकीदरम्यान कच्च्या तेलाच्या किमती वाढताना दिसल्या. पण या साऱयाचा भारतीय शेअर बाजारावर फारसा नकारात्मक परिणाम मात्र सुदैवाने जाणवला नाही. मिडकॅप व स्मॉलकॅप निर्देशांक अनुक्रमे 117, 253 अंकांनी वधारले होते. बँकिंग, धातू यांच्या निर्देशांकांनी अनुक्रमे 404 अंक, 381 अंकांच्या वाढीसह बाजाराला उत्तम आधार देण्याचे काम केले. बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचे बाजार भांडवल 279.82 लाख कोटींनी वाढलेले दिसले.
यापूर्वी शुक्रवारी सेन्सेक्स 37 अंकांनी वधारत 58,803 अंकांवर तर निफ्टी 3 टक्के घसरणीसह 17,539 अंकांवर बंद झाला होता.
विदेशातील बाजारांचा विचार करता आशियाई बाजारात शांघाई कम्पोझीट 0.4 टक्के वाढलेला होता. तर निक्की 0.1 टक्के, हँगसेंग 1.2 टक्के व कोस्पी 0.2 टक्के इतका घसरलेला दिसला. तर अमेरिकेतील नॅसडॅक निर्देशांक 154 अंकांनी घसरलेला होता तर युरोपातील बाजारही नकारात्मक कल दाखवत होता.









