सेन्सेक्स 548 अंकांनी नुकसानीत,आयटी, धातू कंपन्या दबावात
वृत्तसंस्था/ मुंबई
सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअर बाजारात घसरण पहायला मिळाली. अमेरिकेतील अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्व पोलाद आणि अॅल्युमिनीयम उत्पादनांवर कर लावण्यासंदर्भातील घोषणा केल्याने बाजारावर त्याचा परिणाम नकारात्मक पहायला मिळाला.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 548 अंकांनी घसरत 77311 अंकांवर बंद झाला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 178 अंकांनी घसरत 23381 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 24 समभागांमध्ये घसरण पहायला मिळाली. तर उर्वरीत 6 समभाग मात्र तेजीसमवेत बंद झाले. सोमवारच्या सत्रामध्ये उर्जा, आयटी आणि धातू निर्देशांकातील कंपन्यांमध्ये दबाव पहायला मिळाला. टाटा स्टिल आणि पॉवरग्रीड कॉर्प यांचे समभाग 3 टक्क्यांपेक्षा अधिक घसरणीत राहिले. सोमवारी एकंदर गुंतवणूकदारांचे 7 लाख कोटी रुपये स्वाहा झाले. जागतिक बाजारामध्ये सोमवारी मिळताजुळता कल होता. सोमवारी सलग चौथ्या सत्रामध्ये शेअर बाजार घसरणीत बंद झाला.
बीएसई लिस्टेड कंपन्यांचे बाजार भांडवल मूल्य सोमवारी 7 लाख कोटी रुपयांनी कमी होत 4,17,71,803कोटी रुपयांवर राहिले होते. शुक्रवारी सेन्सेक्स 97 अंकांनी घसरणीसोबत 77860 अंकांवर बंद झाला होता. तर एनएसई निफ्टी 43 अंकांनी घसरत 23560 अंकांवर बंद झाला. टाटा स्टिल, आयटीसी हॉटेल, भारती एअरटेल या कंपन्यांचे समभाग तेजीमध्ये पहायला मिळाले. तर दुसरीकडे आयटीसी, एसबीआय व ब्रिटानिया या कंपन्यांचे समभाग मोठ्या प्रमाणात घसरणीत होते. विप्रो, एचसीएल टेक्नॉलॉजी, कोटक महिंद्रा बँक, ब्रिटानिया, टाटा कंझ्युमर्स, श्रीराम फायनान्स, आयसीआयसीआय बँक, अपोलो हॉस्पिटल यांचे समभाग तेजीसमवेत बंद झाले. दुसरीकडे एशियन पेंटस्, अॅक्सिस बँक, बीपीसीएल, कोल इंडिया, रिलायन्स, आयशर मोटर्स, बजाज फायनान्स, हिरो मोटोकॉर्प, ओएनजीसी यांचे समभाग घसरणीत राहिले.









