सेन्सेक्स 733 अंकांनी घसरणीत, फार्मा कंपन्या दबावात
वृत्तसंस्था/ मुंबई
आशियाई बाजारात घसरणीसोबत भारतीय शेअर बाजाराचे शुक्रवारचे आठवड्याच्या अखेरच्या दिवसाचे सत्रही घसरणीत होते. सेन्सेक्स 733 तर निफ्टी 236 अंकांनी घसरलेला होता. अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने औषधांवर 100 टक्के शुल्क आकारणीची घोषणा केल्याने फार्मा क्षेत्रातील कंपन्यांवर बाजारात दबाव दिसून आला.
शुक्रवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 733 अंकांनी घसरत 80426 अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 236 अंकांनी घसरत 24654 अंकांवर बंद झाला. बँक निफ्टी निर्देशांक 586 अंकांनी नुकसानीसह 54389 अंकांवर बंद झाला. आयटी निर्देशांक शुक्रवारच्या सत्रातही कमकुवत दिसून आला. हा निर्देशांक जवळपास अडीच टक्के इतका घसरणीत राहिला.
सेन्सेक्समध्ये 30 पैकी 25 समभाग घसरणीत राहिले होते. महिंद्रा आणि महिंद्रा, इटर्नल, सनफार्मा, इन्फोसिस, टाटा स्टील, टेक महिंद्रा, टीसीएस, बजाज फायनान्स, बीईएल, एचसीएल टेक, एशियन पेंटस, ट्रेंट, अदानी पोर्ट, आयसीआयसीआय बँक आणि अॅक्सिस बँक यांचे समभाग घसरणीसोबत बंद झाले. 1 टक्के ते 3.6 टक्के या स्तरावर समभाग घसरले. लार्सन टूब्रो, मारुती सुझुकी, आयटीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टाटा मोटर्स यांचे समभाग मात्र तेजीसमवेत बंद झाले. मिडकॅप निर्देशांक 2.05 टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांक 2.2 टक्के घसरणीत होता. विविध निर्देशांकांमध्ये पाहता सर्वच निर्देशांक नुकसानीसह कार्यरत होते. यामध्ये आयटी 2.3 टक्के, फार्मा 2.2 टक्के आणि बँक निर्देशांक 1 टक्का घसरणीत होता.
विदेशी संस्थात्मक गुंतवणुकदारांनी विक्रीवर भर कायम ठेवला आहे. त्याचबरोबर अमेरिकेने एच वन बी व्हिसा धोरणाबाबत घेतलेली भूमिका आणि तिच्या अंमलबजावणीचे दिलेले आदेश याचा परिणाम बाजारावर पाहायला मिळाला.









