गुंतवणूकदारांनी गमावले चार लाख कोटी रुपये
मुंबई / वृत्तसंस्था
मुंबई शेअरबाजारात गुरुवारी मोठी पडझड पहावयास मिळाली आहे. बाजाराचा निर्देशी सूचकांक 1 हजारहून अधिक अंकांनी घसरला. परिणामी, गुंतवणूकदारांचे साधारणतः चार लाख कोटी रुपयांहून अधिकचे नुकसान झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. नफा कमाई करण्यासाठी विक्रीचा जोर वाढल्याने ही घसरण झाली.
राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्येही मोठी घसरण झाली. दोन्ही बाजारांमधल्या या घसरणीमुळे दोन्ही शेअरबाजारांचे बाजारी मूल्य (मार्केट कॅपिटलायझेशन) चार लाख ते साडेचार लाख कोटी रुपयांनी कमी झाले असल्याचे तज्ञांनी स्पष्ट केले. गेल्या महिन्याभरातील ही एका दिवसातील सर्वात मोठी घसरण आहे. यामुळे मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक 1,071 अंकांनी किंवा 1.71 टक्क्यांनी घसरला. दिवसअखेर तो 58,098.37 अंकांवर बंद झाला.
जवळपास सर्वच क्षेत्रातील कंपन्यांच्या बाजारी मूल्याला या घसरणीचा फटका बसला. त्यामुळे मुंबई शेअरबाजाराच्या मुख्य 30 कंपन्यांपैकी 24 कंपन्यांचे समभाग घसरल्याचे दिसून आले. निफ्टीचीही अवस्था अशीच राहिली. टाटा स्टील, हिंदुस्थान युनिलिव्हर, इन्फोसिस, एचसीएल, डॉ. रेड्डीज लॅब आदी कंपन्यांचा हानी झालेल्या कंपन्यांमध्ये समावेश असल्याचे सांगण्यात आले.









