सेन्सेक्स 206 अंकांनी घसरला, आयटी समभाग दबावात
वृत्तसंस्था/ मुंबई
आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स 206 अंकांनी घसरत बंद झाला. आयटी, बँकिंग आणि ऑटो कंपन्यांचे समभाग घसरणीत राहिले होते. सोमवारच्या तेजीनंतर शेअरबाजारात मंगळवारी दुसऱ्यादिवशी घसरण अनुभवायला मिळाली. खरे पाहता सकाळी शेअरबाजाराची सुरुवात तेजीसह झाली होती. मंगळवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 206 अंकांनी घसरत 80157 च्या स्तरावर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअरबाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 45 अंकांनी घसरत 24579 अंकांवर बंद झाला होता. सेन्सेक्समधील 30 पैकी 15 समभाग तेजीत तर 15 समभाग नुकसानीत होते. आयटी, बँकिंग व ऑटो समभाग घसरणीत होते तर एनर्जी व एफएमसीजी कंपन्यांचे समभाग मजबूत होत बंद झाले.
एफएमसीजी व संरक्षण निर्देशांक तेजीत होता. जीएसटी परिषदेची बैठक 3 व 4 रोजी होणार असून यापूर्वीच टायर कंपन्यांचे समभाग मंगळवारी तेजीत होते. एमआरएफ, जेके टायर्स व सीएट हे समभाग जवळपास 5 ते 6 टक्के इतके वधारलेले होते. दुसरीकडे इथेनॉल उत्पादनावरील बंदी उठवली गेल्याचा परिणाम साखर उत्पादक कंपन्यांच्या समभागावर सकारात्मक दिसून आला. साखर क्षेत्रातील कंपन्या श्री रेणुका शुगर 12 टक्के, धामापूर शुगर 10 टक्के, द्वारकेश शुगर 11 टक्के इतके तेजीत होते. जागतिक स्तरावर सोन्याच्या किमती वाढल्याने याचा परिणाम सुवर्ण कर्ज देणाऱ्या कंपन्यांच्या समभागावर सकारात्मक दिसून आला. मण्णापुरम गोल्डचा समभाग 2 टक्के नफ्यात होता. धातू निर्देशांकात नाल्को व एनएमडीसी यांचे समभाग चमकताना दिसले. सदरचे समभाग मंगळवारी 5 टक्यांपेक्षा अधिक तेजीत होते.
जागतिक बाजारातील चित्र
आशियाई बाजारात जपानचा निक्केई 0.29 टक्के वाढत 42,310 च्या स्तरावर पोहचला होता तर कोरीयाचा कोस्पी 0.94 टक्के वाढत बंद झाला होता.









