सेन्सेक्स 676 अंकांनी घसरला : हिरोमोटोकॉर्पचे समभाग नुकसानीत
वृत्तसंस्था/ मुंबई
जागतिक स्तरावरील समभागांमध्ये कमकुवतता राहिल्याने भारतीय शेअरबाजारात त्याचे पडसाद बुधवारच्या सत्रात दिसून आले आहेत. सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक घसरणीसह बंद झाल्याचे पहायला मिळाले आहेत.
बुधवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 676 अंकांच्या घसरणीसोबत अर्थात 1.02 टक्के घटीसह 65,782 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 207 अंकांनी अर्थात 1.05 टक्का इतका घसरणीसह 19526 अंकांवर बंद झाला होता. भारतीय शेअरबाजार बुधवारी कोसळण्यासाठी तीन कारणे प्रामुख्याने समोर आली आहेत. एक फिचने अमेरिकेतील सॉवरेन रेटिंग एएए वरुन घटवून एए प्लस केले आहे. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी विक्रीवर भर दिल्याचे दुसरे कारणही बाजाराला धक्का देणारे ठरले. जागतिक बाजारात ब्रेंट क्रूड अर्थात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली असून ते आता 85 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले आहे. याचाही परिणाम बाजारावर दिसून आला.
निफ्टीत हिरो मोटोकॉर्पचा समभाग सर्वाधिक म्हणजेच 3.49 टक्के इतका घसरणीत होता. हिरो मोटोकॉर्पचे चेअरमन पवन मुंजाल यांच्या घरी इडीने कारवाई केली असल्याचे परिणाम हिरो मोटोकॉर्पच्या समभागावर सलग दुसऱ्या दिवशी दिसून आला. सेन्सेक्समध्ये टाटा स्टील आणि टाटा मोटर्सचे समभाग जवळपास 3 टक्के इतके घसरणीत दिसून आले. याशिवाय बजाज फिनसर्व्ह, एनटीपीसी, जेएसडब्ल्यू स्टील आणि एसबीआय यांचे समभाग घसरणीत होते. लार्सन टुब्रो, भारती एअरटेल, अॅक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक, पॉवरग्रिड कॉर्प, एचडीएफसी बँक, टायटन, आयटीसी, रिलायन्स, मारुती, इन्फोसिस, बजाज फायनान्स आणि इंडसइंड बँक यांचे समभाग सुमारे 1 टक्का इतके घसरणीसह बंद झाले होते. पण दुसरीकडे नेस्ले इंडिया, एशियन पेंटस, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि टेक महिंद्रा यांचे समभाग मात्र 1 टक्कापेक्षा जास्त तेजी दाखवत बंद झाले. सर्व क्षेत्रांचे निर्देशांक घसरणीसह बंद झाले.
जागतिक बाजारात दबाव
जागतिक बाजारात अमेरिकेतील डोव्ह जोन्स 71 अंकांसह तेजीत होता तर नॅसडॅक मात्र 62 अंकांनी घसरणीत होता. युरोपातील बाजारात घसरण अनुभवायला मिळाली. आशियाई बाजारातही दबावाचे वातावरण पाहायला मिळाले. निक्की सर्वाधिक 768 अंकांनी कोसळला होता. सोबत कोस्पी 50, हँगसेंग 493 आणि शांघाई कम्पोझीट 29 अंकांनी घसरणीत होता.









