सेन्सेक्स घसरणीत तर निफ्टी तेजीत : ऑटो निर्देशांकाची चमक
मुंबई :
आशियाई बाजारातील सकारात्मक संकेताच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी अखेरच्या दिवशी शेअर बाजारात चढउतार पहायला मिळाला. दोन्ही निर्देशांक सपाट स्तरावर बंद झालेले दिसून आले. आयटी समभागांमध्ये दबाव पहायला मिळाला.
शुक्रवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 7 अंकांनी घसरत 80710 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 6 अंकांनी वाढत 24741 च्या स्तरावर बंद झाला. आयटी निर्देशांक घसरणीत दिसून आला. बँक निफ्टी निर्देशांक 39 अंकांवर वाढत 54114 अंकांवर बंद झाला. एफएमसीजी समभागांमध्ये नफा वसुलीवर भर देण्यात आला होता. तसेच आयटी समभागांच्या कमकुवत कामगिरीमुळे शेअरबाजाराला अपेक्षित तेजी राखता आली नाही. सेन्सेक्स सकाळी 300 अंकांनी वाढत 81012 च्या स्तरावर खुला झाला होता. जीएसटी कपातीचा काहीसा दिलासा मिळालेला असला तरी वास्तविकपणे त्याचा कितपत परिणाम होणार हे कळण्यासाठी काही काळ थांबावे लागणार आहे.
सेन्सेक्समध्ये महिंद्रा आणि महिंद्रा, मारुती सुझुकी, रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे समभाग सर्वाधिक तेजीत होते. तर दुसरीकडे आयटीसी, एचसीएल टेक्नॉलॉजी आणि टीसीएस यांचे समभाग सर्वाधिक घसरलेले पहायला मिळाले. एनएसईवर आयशर मोटर्स व श्रीराम फायनान्स तेजीसमवेत कार्यरत होते. निफ्टी मिडकॅप 100 निर्देशांक 0.20 टक्के वाढत बंद झाला तर निफ्टी स्मॉल कॅप 100 निर्देशांक 0.19 टक्के वाढत बंद झाला. विविध निर्देशांकामध्ये ऑटो निर्देशांकाने 1.25 टक्के तेजीसह दमदार कामगिरी केली होती. यानंतर मेटल 0.68 टक्के आणि मीडिया 0.59 टक्के वाढीसोबत बंद झाले. एफएमसीजी 1.42 टक्के, रियल्टी 1.16 टक्के आणि आयटी निर्देशांक 1.44 टक्के इतका घसरणीत रहिला होता.
जागतिक बाजारात
आशियाई बाजारात शुक्रवारी तेजी पहायला मिळाली. अमेरिकेतील एस अँड पी-500 निर्देशांक 0.80 टक्के वाढत विक्रमी स्तरावर बंद झाला. जपानचा निक्केई 1.39 टक्के वाढत बंद झाला. दक्षिण कोरियाचा कोस्पी 0.26 टक्के वाढलेला दिसून आला.









