सेन्सेक्स 329अंकांनी तेजीत आयटी निर्देशांकाची चमक
वृत्तसंस्था/ मुंबई
आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी भारतीय शेअर बाजार तेजीसमवेत बंद होण्यामध्ये यशस्वी झाला होता. आयटी निर्देशांकाच्या तेजीमुळे सेन्सेक्स 329 अंकांनी वाढत बंद झाला. सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 329 अंकांनी तेजीसह 81,635 अंकांवर बंद झाला तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निफ्टी निर्देशांक 97 अंकांनी वाढत 24,967 च्या स्तरावर बंद झाला. निफ्टी बँक निर्देशांक 10 अंकांच्या घसरणीसोबत 55,139 च्या स्तरावर बंद झाला. निफ्टी मिडकॅप निर्देशांक 72 अंकांनी वाढत 57,702 अंकांवर बंद झाला. सोमवारी आयटी कंपन्यांच्या समभागांनी चांगली तेजी दर्शवली होती. यासोबतच रियल्टी, मेटल आणि फार्मा निर्देशांकसुद्धा तेजीमध्ये कार्यरत होता. दुसरीकडे पीएसयु बँक, ऊर्जा आणि पीएसई समभागांमध्ये मात्र दबाव पाहायला मिळाला.
सोमवारी आयटी समभागांमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी पाहायला मिळाली. टीसीएस, इन्फोसिस, एचसीएल टेक्नॉलॉजीज आणि विप्रो यांचे समभाग दमदार तेजीत होते. निफ्टीमधून बाहेर पडलेले हिरो मोटो कॉर्प आणि इंडसइंड बँक एक ते दोन टक्के तेजीसह बंद झाले. नव्याने सुधारित घोषणा झालेले जीएसटी दर हे उत्सवी काळाच्या आधीच अंमलात येणार असल्याची बातमी शेअर बाजारात उत्साह निर्माण करु शकली. एंजल वनचा समभाग दोन ते तीन टक्के घसरला होता. वोडाफोन आयडियाचा समभाग शुक्रवारी तसेच नंतर सोमवारी सुद्धा तेजीत पाहायला मिळाला. सोमवारी हा समभाग 5 टक्के वाढत बंद झाला. सरकारकडून आयाती संदर्भातला नियम कठोर करण्यात आल्यामुळे पेपर संबंधित समभागांमध्ये खरेदी पाहायला मिळाली. टीएनपीएल, मालू पेपर, वेस्टकोस्ट पेपर आणि जेके पेपर यांचे समभाग दहा ते 17 टक्के वाढीसह कार्यरत होते.
रिझर्व बँकेचे गव्हर्नर यांनी भारत ही लवकरच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार असून जागतिक तणाव आणि भूराजकीय तणावांच्या पार्श्वभूमीवर भारत प्रगती करेल असे वक्तव्य केले आहे. या वक्तव्याचा सकारात्मक परिणाम बाजारावर पाहायला मिळाला. त्यासोबतच अमेरिकेतील फेडरल रिझर्व्ह बँक येत्या काळात व्याजदर कमी करू शकते असे विधान चेअरमन जेरोम पॉवेल यांनी केले आहे. दुसरीकडे भारतासाठी फिचने स्थिर रेटिंग कायम ठेवल्याने त्याचाही सकारात्मक परिणाम शेअर बाजारावर पाहायला मिळाला.









