सेन्सेक्समध्ये 240 अंकांची वाढ : कोल इंडियाचा समभाग तेजीत
वृत्तसंस्था/ मुंबई
जागतिक सकारात्मक वातावरण तसेच आर्थिक विकासातील उत्साहवर्धक आकडेवारी या पार्श्वभूमीवर भारतीय शेअरबाजार सोमवारी तेजीसोबत बंद झाला होता. सलग दुसऱ्या सत्रात शेअरबाजार तेजीसोबत बंद झाला असून विदेशी गुंतवणूकीचा वाढता प्रवाह व आयटी कंपन्यांच्या समभागात खरेदीमुळे बाजाराला गती घेता आली.
सोमवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 240 अंक म्हणजेच 0.37 टक्के इतका वधारत 65,628 अंकांवर तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निफ्टी निर्देशांक 93 अंक म्हणजेच 0.48 टक्के तेजीसोबत 19,528 अंकांवर बंद झाला होता. निफ्टीत कोल इंडियाचा समभाग सर्वाधिक 4.64 टक्के इतका वधारत बंद झाला. विप्रोचे समभागदेखील 4 टक्के वाढले होते. पण महिंद्रा आणि महिंद्राचे समभाग तसेच नेस्ले इंडियाचे समभाग जवळपास 1 टक्का इतके घसरत बंद झाले हेते. सोमवारी सर्व क्षेत्रांचे निर्देशांक तेजीसोबत बंद झाले होते. ऊर्जा, धातू, ऑटो, रिअल इस्टेट आणि सार्वजनिक बँक आदींचे निर्देशांक जवळपास 1 ते 2.8 टक्के वधारत बंद झाले आहेत. बीएसई मिडकॅप व स्मॉलकॅप निर्देशांक प्रत्येकी 1 टक्का वधारले होते.
हे समभाग तेजीत
बीएसई सेन्सेक्स निर्देशांकात विप्रोचे समभाग 4.34 टक्के वधारत बंद झाले होते तर यासोबत एचसीएल टेक, अल्ट्राटेक सिमेंट, टाटा स्टील, टेक महिंद्रा, एनटीपीसी, इन्फोसिस, पॉवरग्रिड कॉर्प, टीसीएस आणि एसबीआय यांचे समभाग 1 टक्कापेक्षा जास्त वधारलेले होते. एचडीएफसी बँक, जेएसडब्ल्यू स्टील, लार्सन टुब्रो, मारुती सुझुकी आणि इंडसइंड बँक यांचे समभाग तेजीसोबत बंद झाले.
हे समभाग घसरले
महिंद्रा आणि महिंद्राचे समभाग सर्वाधिक 0.97 टक्के घसरले. याशिवाय अॅक्सिस बँक, आयटीसी, एशियन पेंटस्, बजाज फायनान्स, नेस्ले इंडिया, कोटक महिंद्रा बँक, टायटन, टाटा मोटर्स आणि आयसीआयसीआय बँक यांचे समभाग मात्र घसरणीत होते.