वाहन चालक, लोकांना त्रास
प्रतिनिधी /पणजी
पाटो – पणजी येथील संस्कृती भवन समोरील उंचवटा असलेल्या रस्त्यावर दररोज दुर्गंधीयुक्त पाणी येत असून ते तुंबून राहात असल्याने वाहन चालक तसेच तेथील इमारतीमधील नोकरी-व्यवसाय करणाऱयांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्याबाबत तक्रारी करुनही कोणीच दखल घेत नाही आणि उपाययोजन करीत नसल्याची माहिती तेथील लोकांनी दिली.
पाटो पुलाच्या खाली असलेल्या खाडीतील पाणी भरतीच्यावेळी वर येते आणि ते गटारातील पाण्यात मिसळते व तेच पाणी रस्त्यावर येऊन साचते. त्याचा निचरा होत नाही. संस्कृती भवनासमोरील उंचवटा असलेल्या ठिकाणी खाली गटार असून ते फुटले आहे. त्यातील घाण पाणी खाडीच्या भरतीतील पाण्यासोबत वर येते. त्या पाण्यास घाण वास येतो. शिवाय पावसाचे पाणी त्यात मिसळून ते इतरत्र पसरते. वाहने जाता-येताना हे घाण पाणी इतर वाहन चालकांवर चालत जाणाऱया – येणाऱयांवर उसळते.
या प्रकरणाची दखल कोणीच घेत नसल्याने तेथील लोक संताप प्रकट करीत असून यावर त्वरित तोडगा काढून सदर समस्या दूर करावी अशी मागणी करण्यात येत आहे. तेथे विविध प्रकारची सरकारी, खासगी कार्यालये असून लोकांना आपली वाहने घाण पाण्यातून न्यावी लागतात अशा तक्रारी आहेत.









