पुणे / प्रतिनिधी :
जूनमध्ये ओढ दिलेल्या पावसाचे जुलैमध्ये आगमन झाले असले, तरी अद्यापही पावसाचा तितकासा जोर नसल्याचे दिसत आहे. पुढच्या तीन दिवसांत कोकण-गोव्यासह मध्य महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाडय़ाच्या काही भागांत मुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दरम्यान, दमदार पावसाची अद्यापही राज्याला प्रतीक्षाच असल्याचे चित्र आहे.
यंदा राज्यात उशिरा पावसाचे आगमन झाले. त्यामुळे जूनमध्ये पाऊस उण्यातच राहिला. जुलैमध्ये चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. मात्र, दहा दिवस उलटल्यानंतरही राज्याचा काही भाग वगळता बहुतांश भागांतील नागरिकांना पावसाची प्रतीक्षा आहे. अनेक जिल्हय़ांमध्ये शेतीचे कामे सुरू झाली असली, तरी पुढच्या टप्प्यात दमदार पाऊस व्हावा, अशी अपेक्षा राज्यातील शेतकरी बाळगून आहेत.
पुढच्या तीन दिवसांत कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागांत मुसळधार पावसाची अथवा मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.








