बिबट्यांची वाढती संख्या आणि त्यांचा मानवांशी संघर्ष यामुळे महाराष्ट्र राज्य सरकार बिबट्यांची नसबंदी करण्याचा विचार करत आहे. या नसबंदीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार असून त्यासंबंधीची तयारी राज्य सरकारकडून होत आहे. भारतात बिबट्यांची संख्या तिसर्या क्रमांकावर असून अलीकडच्या काळात या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे वनअधिकाऱ्यांच्या अहवालात नोंदवले आहे.
मानव आणि बिबट्यामधील संघर्ष कमी करण्यासाठी वनविभागही उपाययोजना करत आहे. त्यामध्ये पिंजऱ्यांची संख्या आणि अपघातग्रस्त बिबट्यांना वाचवण्यासाठीच्या वाहनांमध्ये वाढ करणे अशा उपाययोजना आहेत. महाराष्ट्रापाठोपाठच गुजरातनेही बिबट्यांच्या नसबंदीसाठी केंद्र सरकारकडून परवानगी मागितली आहे.
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नुकत्याच घेतलेल्या आढावा बैठकीत या विभागाला नसबंदीसाठी कृती आराखडा तयार करण्यास सांगण्यात आले. लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी इतर राज्यांनी कोणती पावले उचलली आहेत याचाही अभ्यास करण्याचे निर्देशही विभागाला देण्यात आले आहेत. “ नसबंदीसारख्या निर्णयांबाबतकेंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागेल. बिबट्यांद्वारे माणसांवर हल्ला करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. नसबंदी हा एक उपाय आहे ज्यावर आपण विचार करत आहोत,” मुनगंटीवार पुढे म्हणाले.
भारतातील बिबट्यांच्या 2018 च्या अहवालानुसार भारतातील 12, 852 बिबट्यांपैकी 1, 690 बिबटे हे महाराष्ट्रात आहे. तर सगळ्यात जास्त मध्य प्रदेश (3, 421) आणि कर्नाटक (1,783) यांचा क्रमांक लागतो. बिबट्यांच्या संख्येत महाराष्ट्र देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. असे असले तरी, गेल्या काही वर्षांत या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे वन अधिकाऱ्यांचे मत आहे.