चोरी ही जिवंत माणसाकडूनच केली जाऊ शकते, अशी आपली समजूत आहे. एक पुतळा चोरी करु शकतो, असे कोणी सांगितल्यास ते कोणालाही खरे वाटणार नाही. तथापि, पोलंड या देशाची राजधानी वॉर्सा येथे एक अशी घटना घडली आहे, की आता प्रत्येक दुकानदाराला आपल्या दुकानी ठेवलेल्या शोभेच्या पुतळ्यांवरही बारकाईने लक्ष ठेवल्यावाचून गत्यंतर राहणार नाही.
आपण पाहतो, की कित्येक दुकानांमध्ये, विशेषत: कपड्याच्या किंवा दागिन्यांच्या दुकानांमध्ये शोभेसाठी किंवा कपडे तसेच दागिने अंगावर कसे दिसतील हे ग्राहकांना कळावे यासाठी पुतळे ठेवलेले असतात. या पुतळ्यांवर कपडे किंवा दागदागिने घातलेले असतात. वॉर्सा येथील एका दागिन्यांच्या दुकानातही असे पुतळे होते. याच पुतळ्यांमध्ये अगदी हुबेहूब पुतळ्यासारखा भासेल, असा एक चोर येऊन थांबला. त्याचे कौशल्य असे की, तो किंचितही हालचाल न करता, थेट पुतळ्यासारखाच स्तब्ध उभा होता. दुकानातील नोकरांच्या लक्षातही तो आला नाही. नंतर, या ‘पुतळ्या’ने कोणाचे लक्ष नाही असे पाहून अनेक मौल्यवान दागिने उचलले आणि आल्या पावली तो पसार झाला. दुकान बंद करण्याच्या वेळी कर्मचाऱ्यांनी हिशेब केला तेव्हा दागिन्यांची चोरी झाल्याचे लक्षात आले. तसेच दुकानातील एक पुतळाही गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे शंकेची पाल चुकचुकली. पण चोरटा सापडला नाही. याच चोराने असाच प्रकार दुसऱ्या एका दुकानातही केला, पण येथे मात्र तो पकडला गेला. सध्या तो पोलिसांच्या ताब्यात असून त्याची चौकशी सुरु असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
म्हणूनच आता दुकानात येणारी ग्राहके आणि इतर माणसे यांच्याप्रमाणेच तेथे शोभेसाठी ठेवलेल्या पुतळ्यांवरही दुकानाच्या मालकाला किंवा तेथील नोकर चाकरांना नीट लक्ष ठेवावे लागणार आहे. कारण, चोरी करण्यासाठी लोक कोणकोणत्या युक्त्या शोधून काढतील याचा काही नेम नाही.









