कारागृह म्हणजे वसतीसाठी जगातील सर्वात वाईट स्थान असा समज आहे. गंभीर गुन्हे केलेल्यांना जन्मठेपेची शिक्षा दिली जाते. त्यानंतर आयुष्याचा बहुतेक काळ त्यांना कारागृहातच व्यथित करावा लागतो. शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतरही समाजात किंमत मिळत नाही. त्यामुळे त्यांचे जीवनच उद्ध्वस्त होते. अन्यत्र कोठेही प्रतिष्ठा न मिळाल्याने त्यांना पुन्हा गुन्हेगारी विश्वाकडे वळावे लागते.
तथापि अलीकडच्या काळात कारागृहांमधील वातावरण बदलले आहे. कारागृहात कायद्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जात आहे. काही कैद्यांनी हे प्रशिक्षण घेऊन एवढी प्रगती केली आहे की, विविध वस्तूंचे उत्पादन कारागृहातच करून ते तेथून आपली बाहेर असलेली कुटुंबे पोसत आहेत. अनेक कैदी स्वःकष्टाने आणि स्वःताच्या कौशल्याच्या आधारावर लखपती बनल्याची उदाहरणे आहेत. बाहेरच्या जगात जितका रोजगार मिळणार नाही तितका त्यांना कारागृहात मिळत आहे.
आग्रा येथील कारागृहात असे अनेक लखपती कैदी आहेत. त्यांचे प्रत्येकांचे उत्पन्न वर्षाकाठी तीन ते चार लाखांचे असू शकते. आपल्या हस्तकौशल्याचा उपयोग करून ते अनेक वस्तू बनवितात. या वस्तू बाजारात विकल्यानंतर त्यांना विक्रीच्या किंमतीमधील मोठा हिस्सा दिला जातो. अशा प्रकारे खात्रीचा रोजगार मिळाल्याने त्यांच्या आर्थिक स्थितीत मोठी सुधारणा झाली आहे.