पुढील सुनावणी 18 मार्च रोजी होणार : यूपीएससी परीक्षेत फसवणूक केल्याचा आरोप
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
माजी प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर हिच्या अटकेवरील स्थगिती शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने 17 मार्चपर्यंत वाढवली. यापूर्वी 15 जानेवारी रोजी झालेल्या शेवटच्या सुनावणीत न्यायालयाने अटकेला स्थगिती दिली होती. आता न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्न आणि न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने खेडकर हिच्या अटकेला मनाई करतानाच तपासात सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 18 मार्च रोजी होईल.
पूजा खेडकर प्रकरणात शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. याप्रसंगी आम्ही तपासात सहकार्य करत आहोत पण पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी बोलावलेले नाही, असे खेडकर हिच्यावतीने बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील सिद्धार्थ लुथरा यांनी न्यायालयाला सांगितले. पूजाच्या अटकपूर्व जामीन अर्जाला उत्तर देण्यासाठी दिल्ली पोलिसांना दिलेला वेळही सर्वोच्च न्यायालयाने वाढवला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने पूजाचा जामीन अर्ज फेटाळला होता. पूजा खेडकरवर यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी इतर मागासवर्गीय आणि अपंगत्व कोट्याअंतर्गत आरक्षण मिळविण्यासाठी फसवणूक केल्याचा आरोप आहे.
गेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली उच्च न्यायालयाचा 23 डिसेंबर 2024 चा आदेश रद्द केला होता. पूजाची बाजू मांडणारे वरिष्ठ वकील सिद्धार्थ लुथरा म्हणाले होते की उच्च न्यायालयाच्या आदेशात काही टिप्पण्या आहेत ज्या खटला सुरू झाल्यावर पूजाविरुद्ध वापरल्या जाऊ शकतात. यावर खंडपीठाने यूपीएससी आणि दिल्ली सरकारला नोटीस बजावली होती. पूजाचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळताना दिल्ली उच्च न्यायालयाने कडक टिप्पणी केली होती. ‘ही केवळ एका संवैधानिक संस्थेचीच नव्हे तर समाजाची आणि संपूर्ण देशाची फसवणूक आहे’, असे न्यायालयाने म्हटले होते. सुरुवातीला 1 ऑगस्ट 2024 रोजी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने पूजाचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. यानंतर पूजा दिल्ली उच्च न्यायालयात पोहोचली होती.









