काही चित्रपटांचा रिमेक करू नये
बॉलिवूडमध्ये गाजलेल्या चित्रपटांचा रिमेक तयार करणे नवी गोष्ट नाही. अनेक कलाकार अशाप्रकारच्या रिमेकमध्ये आनंदाने काम करतात. नवोदित कलाकार तर जुन्या हिट चित्रपटांच्या रिमेकसाठी उत्सुक असतात. परंतु सारा अली खानने रिमेक चित्रपटांमध्ये काम करण्यास नकार दिला आहे. साराने यापूर्वी ‘कुली नंबर 1’ आणि ‘लव्ह आज कल’ यासारख्या रिमेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. परंतु आता तिने कुठल्याही रिमेकचा प्रस्ताव स्वीकारणार नसल्याचे जाहीर केले आहे. आतापर्यंत मी दोन रिमेक चित्रपटांमध्ये काम केले असून यातून मी चांगलाच धडा शिकला आहे. यामुळे भविष्यात कुठल्याही रिमेकमध्ये काम करणार नाही. तसेही काही चित्रपटांचा रिमेक करणे चुकीचे ठरणार असल्याचे साराने म्हटले आहे. मी माझ्या आईप्रमाणे दिसत असले तरीही तिच्यासारखा अभिनय करू शकत नाही. माझ्या आईसोबत प्रसारमाध्यमे सातत्याने तुलना करत राहतात. यामुळे माझ्या आईच्या चित्रपटाच्या रिमेकमध्ये काम करण्याची माझी इच्छा नसल्याचे साराने म्हटले आहे. सारा यापूर्वी ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटात दिसून आली होती. यात तिच्यासोबत विक्की कौशल होता आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली होती. सारा लवकरच करिश्मा कपूर आणि संजय कपूरसोबत ‘मर्डर मुबारक’ चित्रपटात दिसून येणार आहे. याचबरोबर ती ‘मेट्रो… इन दिनों’ चित्रपटातही काम करत आहे. यात ती आदित्य रॉय कपूरसोबत झळकणार आहे. तर करण जौहरकडून निर्मिती होणाऱ्या ‘ऐ वतन मेरे वतन’ या चित्रपटात सारा मुख्य भूमिकेत आहे.









