केवळ 20 दिवसांत 30 हून अधिक चोरीच्या घटना : स्थानिक गुन्हेगारांबरोबरच आंतरराज्य गुन्हेगारही सक्रिय
बेळगाव : बेळगाव शहर व तालुक्यात चोऱ्या, घरफोड्या वाढल्या आहेत. केवळ वीस दिवसांत 30 हून अधिक चोऱ्या घडल्या आहेत. स्थानिक गुन्हेगारांबरोबरच आंतरराज्य गुन्हेगारांचाही बेळगावात वावर वाढला आहे. चोरीच्या घटनांच्या तुलनेत तपास संथ गतीने सुरू आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या मालमत्तेच्या सुरक्षेचा प्रश्न ठळक चर्चेत आला आहे. ‘आम्ही आहे, तुम्ही घाबरू नका’ म्हणणारी पोलीस यंत्रणा पूर्णपणे सुस्तावली आहे. त्याचाच फायदा गुन्हेगार घेत आहेत.
केवळ 1 ते 20 एप्रिलपर्यंतच्या वीस दिवसातील घटना लक्षात घेता बेळगावात मोठ्या प्रमाणात चोऱ्या सुरू झाल्याचे लक्षात येते. केवळ बंद घरांनाच चोरट्यांनी लक्ष्य बनविले असे नाही. घरातील मंडळी असतानाही चोऱ्या होऊ लागल्या आहेत. कधी दर्शनी दरवाजाचा कडीकोयंडा तोडून तर आणखी कधी पाठीमागचा दरवाजा फोडून चोऱ्या करण्यात येत आहेत. मोटरसायकलींची चोरी व चेनस्नॅचिंगच्या घटनाही वाढल्या आहेत.
सध्या सुटीचे दिवस आहेत. वार्षिक परीक्षा व परीक्षांच्या निकालानंतर शाळांना सुटी आहे. लोक आपल्या मुलांना घेऊन गावी जात आहेत. घराला कुलूप लावून गावी गेल्यानंतर परत येईपर्यंत आमचे घर सुरक्षित राहीलच, याची शाश्वती राहिली नाही. 30 पैकी अनेक घटनांत सुटी घालवण्यासाठी गावी गेल्यानंतरच परत येण्याआधीच शेजाऱ्यांचा फोन येतो, ‘तुमच्या घरचा दरवाजा उघडा आहे. तुम्ही गावाहून परत आला आहात का?’ त्यावेळी घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात येते. सुटीचा मूड घालवून घाईगडबडीत ते घरी येतात. पोलीस स्थानकात तक्रार नोंदविली जाते.
जनजागृती आवश्यक
खरेतर वाढत्या चोऱ्या, घरफोड्यांच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाच्यावतीने किमान जनजागृती तरी हाती घ्यायला हवी होती. सुटीच्या दिवसात दरवर्षीच चोऱ्या वाढतात. पोलिसांना त्याची चांगलीच कल्पना आहे. काही अधिकारी आपल्या पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात नागरिकांच्या बैठका घेऊन जागृती करीत असतात. सध्या पोलीस दलाने याकडे पाठ फिरवल्याचे दिसून येते. अवचारहट्टी येथील परशराम तुळजाई यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून पाच लाख रुपयांचा ऐवज पळविल्याचे 1 एप्रिल रोजी उघडकीस आले. 4 एप्रिल रोजी उज्ज्वलनगर येथील मोबिन यरगट्टी व नईम कुडची यांची घरे फोडून चोरट्यांनी सहा लाखांचा ऐवज पळविल्याचे उघडकीस आले.
त्याच दिवशी रात्री हंगरगे येथील एका शेतवडीतील लोखंडी कुंपण तोडून सहा शेळ्या पळविण्यात आल्या आहेत. 6 एप्रिल रोजी सुळगा-हिंडलगा येथील एका बंद घराचा कडीकोयंडा तोडून साडेतीन लाख रुपयांहून अधिक किमतीचे दागिने व रोकड पळविण्यात आली आहे. 8 एप्रिल रोजी रात्री मंजुळा मंजुनाथ शेठ, राहणार लक्ष्मी रोड, वडगाव यांच्या गळ्यातील साडेतीन तोळ्याचे मंगळसूत्र पळविण्यात आले. त्याच दिवशी मध्यरात्री अयोध्यानगर येथील एका घरासमोरून चंदनाचे झाड चोरण्यात आले. क्रांतीनगर-गणेशपूर येथील एका लष्करी जवानाच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून सोन्या-चांदीचे दागिने पळविल्याचे 11 एप्रिल रोजी उघडकीस आले. 14 एप्रिलला गोजगे येथील विनोद होनगेकर यांचे बंद घर फोडून तीन लाखांचा ऐवज चोरट्यांनी पळविल्याचे उघडकीस आले.
पडीबसवेश्वरनगर-हिरेबागेवाडी येथे चोरी
पडीबसवेश्वरनगर-हिरेबागेवाडी येथील सुजाता कुंभार या 11 एप्रिल रोजी आपल्या घराला कुलूप लावून काकतीला बहिणीकडे आल्या होत्या. दोन दिवसांनंतर 13 एप्रिल रोजी त्या घरी परतल्या. त्यावेळी त्यांच्या घरी चोरी झाल्याचे उघडकीस आले. चोरट्यांनी 50 ग्रॅम सोने, चांदीची आरती, 10 हजार रुपये पळविल्याचे उघडकीस आले. याच काळात उचगाव येथील रघुनाथ लाळगे यांच्या घराच्या पाठीमागच्या दरवाजाची कडी काढून पाच लाखांचा ऐवज पळविण्यात आला. मारिहाळ येथील चन्नबसय्या हिरेमठ यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून 14 एप्रिल रोजी चार लाखांचा ऐवज पळविण्यात आला. होनियाळ येथील सुजाता माळवी या 15 एप्रिल रोजी दुपारी आपल्या घराला कुलूप लावून हल्याळ तालुक्यातील बेळवटगीला गेल्या होत्या. 16 एप्रिलला घरी परतल्या, त्यावेळी बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी 30 ग्रॅम सोने, 10 ग्रॅम चांदी, 20 हजार रुपये पळविल्याचे उघडकीस आले.
खंजर गल्ली येथील सीजा शेख यांच्याबाबतही अशीच घटना घडली आहे. 13 एप्रिल रोजी आपल्या घराला कुलूप लावून त्या आपल्या कुटुंबीयांसोबत कोल्हापूर येथील आईच्या माहेरी गेल्या. 16 एप्रिल रोजी बेळगावला परतल्या. त्यावेळी त्यांच्या घरी चोरी झाल्याचे उघडकीस आले. चोरट्यांनी 19 ग्रॅम सोने, 100 ग्रॅम चांदी, 25 हजार रोख रक्कम पळविल्याचे उघडकीस आले. माजी सैनिकांची घरेही फोडण्यात आली आहेत. सरस्वतीनगर-गणेशपूर येथील माजी सैनिक शिवराम भट्ट हे 10 एप्रिल रोजी आपल्या घराला कुलूप लावून परगावी गेले होते. 17 एप्रिलला घरी परतले. त्यावेळी बंद घराचा कडीकोयंडा तोडून 118 ग्रॅम सोन्याचे दागिने, 350 ग्रॅम चांदी असा एकूण 10 लाख रुपयांहून अधिक किमतीचा ऐवज चोरट्यांनी पळविल्याचे उघडकीस आले. होनियाळ येथील भारती सोलबक्कन्नावर या 13 एप्रिल रोजी घराला कुलूप लावून परगावी गेल्या होत्या. 17 एप्रिलला घरी परतल्या त्यावेळी त्यांच्या घरातील लाखाचा ऐवज चोरट्यांनी पळविल्याचे उघडकीस आले.
शांतीनगर टिळकवाडी येथील मुरग्याप्पा मुरली यांच्या घरात 15 एप्रिल रोजी दुपारी चोरी झाली आहे. घरातील सर्व मंडळी असतानाच 145 ग्रॅम सोने व घरासमोर उभी करण्यात आलेली होंडा अॅक्टिव्हा घेऊन चोरट्यांनी पलायन केले आहे. या घटनांवर कळस अशी घटना हलगाजवळ 18 एप्रिल रोजी घडली आहे. पत्नी-मुलांसमवेत मोटरसायकलवरून जाणाऱ्या शिक्षकाच्या मोटारसायकलला पाठीमागून दुचाकीने धडक देऊन खाली पडलेल्या त्याच्या पत्नीला वर उचलण्याच्या बहाण्याने तिच्या गळ्यातील मंगळसूत्र पळविण्यात आले आहे. उदाहरणादाखल दिलेल्या या घटना लक्षात घेता गुन्हेगार पूर्णपणे माजले आहेत, हे दिसून येते. गुन्हेगारांच्या मनात पोलीस यंत्रणेबद्दल कसलीच भीती उरली नाही. मध्यंतरी चोऱ्या वाढल्या, त्यावेळी नागरिकांनी स्वत: होऊन गस्त सुरू केली होती. आता पुन्हा तीच वेळ येऊन ठेपली आहे.
तपास संथ गतीने
चोरीच्या घटनांच्या तुलनेत तपास संथ गतीने आहे. कॅम्प पोलिसांनी गेल्या आठवड्यात वकार अहमद शेख (वय 36), शुभम मुछाला (वय 23) या मध्यप्रदेशमधील जोडगोळीला अटक करून सरस्वतीनगर गणेशपूर येथे दोन महिन्यांपूर्वी झालेल्या चोरीचा तपास लावला आहे. 11 लाख 86 हजार 700 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. दोन वर्षांपूर्वी सोलापूरचा एक अट्टल गुन्हेगार बेळगावात धुमाकूळ घालत होता. त्याचे नाव, पत्ता समजूनही अद्याप त्याला अटक झाली नाही. अनगोळ, वडगाव, शहापूर परिसरात अक्षरश: या गुन्हेगारांच्या कारवायांनी नागरिक हैराण झाले होते. बेळगावात महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात, उत्तरप्रदेश आदी विविध राज्यातून गुन्हेगार अधूनमधून येत असतात. पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी पोलीस यंत्रणेवर पकड ठेवण्यासाठी सुरुवातीपासूनच प्रयत्न चालवले आहेत. अधिकाऱ्यांमधील वाढत्या गटबाजीमुळे पोलीस यंत्रणा निष्क्रिय बनली असून याचाच फायदा गुन्हेगार घेत आहेत.









