चीनसह काही देशांमधील महामारीची नवी लाट म्हणजे कोरोनाचा अजून पूर्णतः नायनाट झाला नसल्याचेच निदर्शक म्हणावे लागेल. मागच्या तीन वर्षांपासून जग कोरोनाशी झुंजते आहे. त्यातून कुठे सावरत असतानाच चीन, अमेरिका व युरोपमधील काही देशांमध्ये कोरोनाचा पुन्हा उद्रेक होणे, नक्कीच चिंताजनक म्हणायला हवे. या चिंतेच्या पार्श्वभूमीवर भारतातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून, गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याच्या सूचना केंद्राकडून देण्यात आल्या आहेत. त्या योग्यच म्हणाव्या लागतील. कोरोनाच्या संसर्गाचा झपाटा काय असतो, हे भारतासारख्या देशाने तीन लाटांमध्ये अनुभवले आहे. या काळात मुखपट्टी वा मास्कचा वापर किती उपयुक्त ठरतो, हे आता आपल्याला नव्याने सांगण्याची गरज नाही. म्हणूनच स्वयंस्फूर्तीने प्रत्येकाने मास्कचा वापर करायला हवा. येत्या आठवडाभरातच आपण सरत्या वर्षाला निरोप देणार असून, नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत करणार आहोत. मॉस्कोपासून ते वॉशिंग्टनपर्यंत आणि दिल्लीपासून ते पॅरिसपर्यंत कोणत्याही देशाची राजधानी असो, शहरे असोत. तेथे थर्टी फर्स्ट आणि न्यू इयर सेलिब्रेशनचा उत्साह काही औरच असतो. या काळात सलग सुटय़ा घेऊन एकत्रितरीत्या कुटुंबीय, मित्रमैत्रिणींसह ख्रिसमस व नवीन वर्षाचे स्वागत करण्याकडे बहुतेकांचा कल असतो. यंदाचे वर्षही या साऱयाला अपवाद नसेल. चीन किंवा अन्य देशांमध्ये रुग्णसंख्या अधिक असली, तरी भारतासारख्या देशात कोरोना रुग्णांची जेमतेम असल्याचे दिसून येते. सध्या या आजाराचे साडेतीन हजारांच्या आसपास रुग्ण उपचाराधीन असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे घाबरून जाण्याचे वा काळजी करण्याचे काहीच कारण नाही. परंतु, पूर्वानुभव पाहता ताकही फुंकून प्यावे लागेल. म्हणूनच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे किंवा मास्कचा वापर करणे, ही पथ्ये पाळायलाच हवीत. त्याकरिता मास्कसक्तीची वाट पाहू नये. लोकल, बस, रेल्वे स्थानके, विमानतळ, भाजी मार्केट, दुकाने, मॉल ही सगळी गर्दीची ठिकाणे होत. नोकरी, व्यवसायासह दैनंदिन गरजांकरिता या ठिकाणी सर्वांना जावेच लागते. परंतु, अशा ठिकाणी जबाबदार नागरिक म्हणून आपण विशेष खबरदारी घेतली, तर ते आपल्यासह सर्वांच्याच फायद्याचे ठरू शकते. भारत हा लोकसंख्येत चीनपाठोपाठ जगातील दुसऱया क्रमांकाचा देश आहे. पहिल्या व दुसऱया लाटेचे जबर तडाखे सोसावे लागलेल्या भारतासारख्या देशात एखादी लसीकरण मोहीम राबविणे, हे तसे दिव्यच. परंतु, केंद्र सरकारने ज्या गतीने व सूत्रबद्धपणे ही मोहीम पुढे नेली, ते काम ऐतिहासिकच म्हणावे लागेल. जुलै 2022 मध्ये भारताने तब्बल 200 कोटी डोसचा पार केलेला आकडा हेच सांगतो. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांसह आरोग्य कर्मचाऱयांचे अभिनंदनही केले होते. वास्तविक आपल्याकडे लसीकरण कार्यक्रम अत्यंत गांभीर्याने हाताळला गेला. त्यासाठी मोठय़ा प्रमाणात जनजागरण, पाठपुरावा करण्यात आला. त्यामुळेच पहिली व दुसरी लस बहुसंख्य लोकांनी घेतल्याचे पहायला मिळते. तुलनेत प्रतिबंधात्मक वा बूस्टर डोसबाबत पाठपुरावा झाला नाही. त्यात कोरोना साथही ओसरल्याने नागरिकही बूस्टरबाबत अनुत्सूकच राहिले. बूस्टर घेतलेल्यांचे 27 ते 28 टक्के प्रमाण हेच दर्शविते. अर्थात वृद्ध व्यक्ती व सहव्याधी असलेल्यांनी प्रामुख्याने वर्धक मात्रा घ्यायला हवी. त्याचबरोबर इतरांनीही आधीच्या व नंतरच्या कोणत्याही लशी राहिल्या असतील, तर त्या घ्यायला हव्यात. कोविड काळात प्रत्येकालाच वेगळय़ा जीवनशैलीचा अंगीकार करावा लागला. यात हात स्वच्छ धुण्यासह सर्व प्रकारची स्वच्छता पाळणे, हस्तांदोलन, अनावश्यक प्रवास वा गर्दीत जाणे टाळणे, मास्क वापरणे व आजाराची लक्षणे असतील, तर इतरांपासून स्वतःला विलग ठेवणे, या गोष्टींचा समावेश होता. या साऱयाचे पालन आजही आवश्यक होय. दुबई व अन्य देशांतून विमानाने आलेल्या प्रवाशांमार्फतच देशात पहिल्या लाटेला सुरुवात झाली होती. म्हणूनच विमान प्रवाशांवर आता विशेष लक्ष द्यावे लागेल. त्यादृष्टीने केंद्राकडून पाऊले उचलण्यात येत असून, 24 तारखेपासून परदेशातून आलेल्या 2 टक्के प्रवाशांची क्रमविरहित कोरोना नमुना चाचणी केली जाणार आहे. हे आवश्यकच आहे. खरे तर चीनसारख्या देशांतील भयावह स्थिती पाहता येथील प्रवासावर निर्बंध असायला हवेत. किमान नागरिकांनी चीन वा तत्सम देशातील प्रवास टाळला, तर ते अधिक योग्य होईल. सर्व पॉझिटिव्ह केसेसचे जीनोम सिक्वेन्सिंग करायला हवे, ही केंद्रीय आरोग्य सचिवांची सूचनाही योग्यच. यातून व्हेरिएंट शोधणे सोपे होईल. चीनमधील बीएफ.7 या व्हेरिएंटची लागण झालेले काही रुग्ण भारतात आढळले आहेत. त्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच असून, या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जाते. हे आश्वासकच. तरीही त्यांच्यावर बारीक नजर ठेवायला हवी. या व्हेरिएंटशी लढण्यासाठी आपल्या लशी कितपत प्रभावी आहेत, याची एकदा पडताळणी झाली, की पुढच्या गोष्टी सुकर होऊ शकतात. तसे पाहिल्यास भारतातील कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिनसारख्या लशींचा रिझल्ट चांगलाच असल्याचे आत्तापर्यंत दिसून आले आहे. सीरमचे सीईओ अदर पूनावाला यांनी चीनमधील स्थिती चिंतेची असली, तरी घाबरून जाण्याचे कारण नाही. आपल्याकडे मोठय़ा प्रमाणावर लसीकरण झाले आहे. आता फक्त सरकारने दिलेल्या निर्देशांचे पालन तेवढे व्यवस्थित करायला हवे, असे म्हटले आहे. स्वाभाविकच हे लसीकरण व सामूहिक प्रतिकारकशक्ती आपल्याला फलदायी ठरेल, अशी आशा आहे. तुलनेत चीनच्या लशी व लसीकरणाबाबत शंका असून, त्यांचा दर्जा चायना मेड मालासारखा तर नाही ना, असा प्रश्न कुणासही पडावा. एकूणच चीन, अमेरिका, जपान, कोरिया, ब्राझीलमधील फैलाव पाहता आपल्यालाही जागते रहावे लागेल. कोरोना अजून संपलेला नाही, याची जाणीव ठेऊन वर्तणूक ठेवली, तर आपली पुढची वाटचालही सहजसुलभ असेल.
Previous Articleतुझं.. माझं… आपलं…
Next Article ओला आणणार आता व्यावसायिक वाहने
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








