लोकसहभागातून काम पुर्णत्वास : पुतळ्याचे सौंदर्य खुलले, काळ्या रंगाआड गेलेली डिझाईन उजेडात
कोल्हापूर, प्रतिनिधी
कोल्हापूर: व्हीनस कॉर्नर येथील छत्रपती राजाराम महाराज यांच्या पुतळ्याला लोकसहभागातून मुळ ब्राँझ स्वरुप आणले आहे. त्यामुळे या पुतळ्याचे सौंदर्य तर खुलले आहेच, शिवाय महाराजांच्या ड्रेसवरील बारीक डिझाईनही ठळकपणे दिसू लागली आहे. छत्रपती राजाराम महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून महापालिकेचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्या हस्ते मुळ ब्राँझ स्वरुप आणलेला हा पुतळा सर्वांसाठी खुला करण्यात आला. यानंतर सरनोबत यांच्यासह उपशहर अभियंता बाबुराव दबडे, सहायक अभियंता व्यंकटेश सुरवसे व ऍड. प्रताप जाधव यांच्या हस्ते पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
छत्रपती राजाराम प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष पद्मश्री सत्यवादीकार बाळासाहेब पाटील यांनी 1983 साली व्हीनस कॉर्नर येथे राजाराम महाराजांचा पुतळा उभा केला. राज्याचे उपमुख्यमंत्री रामराव अधिक यांच्या हस्ते या पुतळयाचे अनावरणही केले. मधल्या काळात जयंतीसह अन्य कार्यक्रमांच्या निमित्ताने पुतळ्याला काळ्या ऑईलपेंटने रंगवले जात होते. त्यामुळे 7 मिलीमीटर जाडीचा रंगाचा थर तयार होऊन पुतळ्याच्या सौंदर्याला बाधा पोहोचली होती. महाराजांच्या ड्रेसवरील बारीक डिझाईनही रंगाच्या आड गेली होती. अशा या पुतळ्याला मुळ ब्राँझ स्वरुप आणण्यासाठी महापालिकेचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी पुढाकार घेतला.
लोकसहभागातून 45 हजार रुपये जमा करुन शिल्पकार महेश डोंगरसाने, त्यांचे चिरंजीव सुमित डोंगरसाने व सहकारी रुपेश सोनवणे यांच्याकडे ब्राँझ कलरींगचे काम सोपवले. त्यांनी गेल्या काही दिवसांपासून परिश्रम घेऊन पुतळ्यावरील काळ्या रंगाचा थर हटवून त्याजागी अतिशय कल्पकतेने ब्राँझ कलर देण्याचे काम केले. त्यामुळे या पुतळ्याचे सौंदर्य अधिकच खुलले असून महाराजांच्या ड्रेसवरील बारीक डिझाईनही ठळकपणे दिसत आहे. आता लवकरच कावळा नाका येथील महाराणी ताराराणी यांचा अश्वारुढ पुतळ्यालाही मुळ ब्राँझ स्वरुप आणले जाईल, असे सरनोबत यांनी सांगितले.