डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण : भारताबाहेरील सर्वात उंच पुतळा
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
भारतानंतर आता जगातील सर्वात विकसित देश अमेरिकेतही ‘जय भीम’चा नारा घुमला आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अमेरिकेतील सर्वात उंच पुतळ्याचे अनावरण राजधानी वॉशिंग्टन डीसी येथे करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने भारतीय वंशाचे लोक उपस्थित होते. या कार्यक्रमप्रसंगी उपस्थितांनी ‘जय भीम’च्या घोषणा दिल्या. डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला ‘स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी’ असे नाव देण्यात आले आहे. वॉशिंग्टन डीसीच्या मेरीलँड या उपनगरात डॉ. आंबेडकरांचा हा पुतळा बसवण्यात आला आहे.
गेल्या आठवड्यातच रविवार, 8 ऑक्टोबर रोजी अमेरिकेतील न्यू जर्सी येथे स्वामीनारायण अक्षरधाम या अमेरिकेतील सर्वात मोठ्या हिंदू मंदिराचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले होते. तब्बल 183 एकर क्षेत्रात विस्तारलेले हे मंदिर साकारल्यानंतर आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पुतळा उभा करत अमेरिकेने मोठी अभिमानास्पद कामगिरी नोंदविली आहे. अमेरिकेत बसविण्यात आलेल्या डॉ. आंबेडकरांच्या या पुतळ्याची निर्मिती प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांनी केली आहे. गुजरातमध्ये नर्मदा नदीच्या काठावर असलेला सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळाही त्यांनीच बनवला होता.
अमेरिकेतील या पुतळ्याचे अनावरण शनिवार, 14 ऑक्टोबर रोजी करण्यात आले असून या कार्यक्रमप्रसंगी हलक्या स्वरुपाचा रिमझिम पाऊस पडत होता. पाऊस असला तरीही लोकांमध्ये उत्साह कमी नव्हता. पुतळ्याच्या अनावरणाच्या वेळी अमेरिका आणि अगदी भारतातील काही लोक मेरीलँडमध्ये उपस्थित होते. तेथे पोहोचण्यासाठी अनेकांनी सुमारे 10 तासांचा प्रवास केला होता. या ऐतिहासिक प्रसंगी शेकडो भारतीय किंवा भारतीय वंशाचे लोक उपस्थित होते. देशाच्या विविध भागांतील भारतीय-अमेरिकनांनीही तेथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले. त्याचवेळी अमेरिकेतील आंबेडकरी चळवळीचे नेतृत्व करणारे दिलीप म्हस्के यांनी कार्यक्रमात सहभागी होताना ‘स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी 140 कोटी भारतीय आणि 45 लाख भारतीय-अमेरिकनांचे प्रतिनिधित्व करेल’ अशी घोषणा केली.
अनावरणाच्या तारखेचे विशेष महत्त्व
अमेरिकेत डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी 14 ऑक्टोबर ही तारीख निवडण्यामागे एक खास कारण आहे. स्वतंत्र भारतात डॉ. आंबेडकरांना पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या पहिल्या मंत्रिमंडळात कायदा व न्याय मंत्री करण्यात आले. आंबेडकरांनी नंतर 14 ऑक्टोबर 1956 रोजी आपल्या समर्थकांसह बौद्ध धर्म स्विकारला. त्यांनी बौद्ध धर्म स्विकारल्याची तारीख आणि मेरीलँडमधील पुतळ्याच्या अनावरणाची तारीख सारखीच ठेवण्यात आली आहे.
13 एकर क्षेत्रात विस्तार
अमेरिकेत ‘स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी’ राष्ट्रपती भवन ‘व्हाईट हाऊस’च्या दक्षिणेस 22 मैलांवर आहे. 13 एकरात बांधलेल्या या केंद्रात पुतळ्यासोबतच लायब्ररी, कन्व्हेन्शन सेंटर आणि बुद्ध गार्डन देखील आहे. या भव्य पुतळ्याच्या माध्यमातून डॉ. आंबेडकरांची लोकप्रियता लोकांमध्ये दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. ‘स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी’ हा पुतळा अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांना प्रेरणा देत राहील, असे अमेरिकेतील आंबेडकरी चळवळीचे नेते दिलीप म्हस्के म्हणाले.









