महापालिका कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन
बेळगाव : विविध मागण्यांसाठी महापालिका कर्मचाऱ्यांनी सामूहिक रजा आंदोलन बेळगावसह राज्यातील विविध महानगरपालिकांमध्ये छेडले आहे. बेंगळूर येथील फ्रीडम पार्कवर आंदोलन सुरू असून बेळगाव महानगरपालिकेतदेखील कर्मचाऱ्यांनी मंगळवारी कामबंद आंदोलन केले. त्याचबरोबर महापालिकेच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन करून घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे मंगळवारी महापालिकेचे सर्व विभागातील कामकाज ठप्प होते. राज्य महापालिका कर्मचारी संघटनेने मंगळवारी एक दिवस आंदोलनाचा निर्णय घेतल्याने त्यात सहभागी होण्यासाठी विविध महानगरपालिकांतील कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी सोमवारीच बेंगळूरला रवाना झाले. त्याचबरोबर बेळगाव महापालिकेतही एक दिवस कामबंद आंदोलन करण्यात येणार असल्याबाबत मनपा आयुक्त आणि महापौरांना कल्पना देण्यात आली होती.
बेंगळूर येथील फ्रीडम पार्कवर विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. त्याचबरोबर बेळगाव मनपातही कर्मचाऱ्यांनी सकाळपासूनच आपले कामबंद ठेवून मनपा प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या अनेक सुविधा महापालिका कर्मचाऱ्यांना दिल्या जात नाहीत. त्या सुविधा मिळाव्यात यासाठी राज्यभरातील महापालिका कर्मचारी आक्रमक झाले आहेत. राज्य महापालिका कर्मचारी संघटनेच्या सूचनेनुसार सर्व कर्मचारी मंगळवारी सामूहिक रजेवर गेले. राज्य सरकारने मागण्यांची पूर्तता न केल्यास बेंगळूर येथील आंदोलन सुरूच राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. नेहमीप्रमाणे बेळगाव महानगरपालिकेत विविध कामांसाठी नागरिकांची गर्दी होत होती. मात्र, सर्वच विभागात अधिकारी व कर्मचारी नसल्याने त्यांना माघारी परतावे लागले. एक दिवस कामबंद आंदोलन पुकारण्यात आल्याने याचा परिणाम दैनंदिन कामकाजावर झाला. त्यामुळे बुधवारपासून तरी परिस्थिती पूर्वपदावर येणार का, हे पहावे लागणार आहे.









