तारकर्ली पर्यटन विकास संस्थेच्या वतीने पोलिसांना निवेदन
मालवण । प्रतिनिधी
जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्राची बदनामी केल्याबद्दल जिल्ह्यातील त्या संबंधित व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी तारकर्ली पर्यटन विकास संस्थेच्या वतीने आज पोलिसांकडे करण्यात आली. याबाबतचे निवेदनही सादर करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्याला महाराष्ट्रातील एकमेव पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर करण्यात आले आहे. येथील नागरिकांनी स्वबळावर आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करून पर्यटन व्यवसाय उभा केला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा आज जलपर्यटनासाठी देशात नावारूपाला आला आहे. मात्र जिल्ह्यातील एका व्यक्तीने सोशल मीडियावर जलपर्यटन व्यावसायिकांवर गंभीर स्वरूपाचे आरोप प्रसारित केले आहेत. यातून जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्राला बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्यामुळे त्या व्यक्तीने प्रसारित केलेल्या खोट्या आरोपांबाबत चौकशी व्हावी. जिल्ह्यातील त्या संबंधीत व्यक्तीला हाताशी धरून सोशल मीडियावर अशा प्रकारची बदनामी करण्याचे षडयंत्र रचत असल्याचा दाट संशय पर्यटन व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे. सिंधुदुर्गच्या पर्यटन व्यवसायातील प्रगतीमुळे अन्य राज्यातील व्यावसायिकांना खुपत असल्यामुळे हे कृत्य होत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घ्यावे आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी पर्यटन व्यावसायिकांनी केली. यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश माने, सुशांत पवार, सुरज रेडकर यांच्यासह पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर, तारकर्ली पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष सहदेव साळगावकर, मंगेश जावकर, राम चोपडेकर, रवींद्र खानविलकर, मिलिंद झाड, केदार झाड, अन्वेषा आचरेकर, निकिता पाटील, पूजा मेस्त्री, सुरेंद्र सकपाळ, तुळशीदास कोयंडे, प्रवीण रेवंडकर आदी पर्यटन व्यावसायिक उपस्थित होते.









