नळ जोडणीसाठी आकारण्यात येणारी रक्कम अन्यायकारक
बेळगाव : कणबर्गी येथील केएचबी कॉलनी येथील रहिवाशांकडून नळ जोडणीसाठी रक्कम घेण्यात आली आहे. मात्र पुन्हा 8 हजार रुपये भरा, असे एलअॅण्डटी कंपनी सांगत आहे. त्यामुळे हा नाहक फटका असून तातडीने महापालिकेने संबंधित कंपनीला सूचना करून रक्कम आकारण्यास मनाई करावी, अशी मागणी केएचबी कॉलनी येथील रहिवाशांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी या परिसराचे नगरसेवक अॅड. हणमंत कोंगाली यांनाही निवेदन देण्यात आले आहे. कंणबर्गी येथील केएचबी कॉलनी उभारणी करताना तेथील रहिवाशांकडून सर्व रक्कम नियमानुसार भरून घेण्यात आली आहे. 15 हजार 800 रुपये रक्कम यापूर्वीच नळ जोडणीसाठी घेण्यात आली आहे. 24 तास पाणी पुरवठा करण्यासाठी ही रक्कम आकारण्यात आली. मात्र पुन्हा एलअॅण्डटी कंपनी 8 हजार रुपये भरा, असा तगादा लावत आहे. अजूनही काही मूलभूत सुविधा या वसाहतींमध्ये देणे गरजेचे आहे. महापालिकेने याबाबत दखल घेऊन तातडीने पाऊल उचलावे, अशी मागणी करण्यात आली. नगरसेवक हणमंत कोंगाली यांना निवेदन देण्यात आले. यावेळी केएचबी कॉलनी संघटनेचे अध्यक्ष आर. व्ही. मळली, पी. बी. पाटील, पी. व्ही. भोसले यांच्यासह नागरिक उपस्थित होते.









