मनपा-ग्रा.पं. समस्येत अडकलेल्यांची गैरसोय : लक्ष घालण्याची मागणी
बेळगाव : पिरनवाडी ग्राम पंचायत व्याप्तीत असणाऱ्या हनुमानवाडीचा महानगरपालिकेत समावेश करण्यात आला आहे. मात्र, येथील रहिवाशांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली जात नसल्याने अनेक अडचणींचा सामना रहिवाशांना करावा लागत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यामध्ये जातीने लक्ष घालून रहिवाशांना दिलासा द्यावा, अशा मागणीचे निवेदन अॅड. नागेश सातेरी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. हनुमानवाडी यापूर्वी पिरनवाडी ग्राम पंचायतीच्या अखत्यारित होती. मात्र, 2013 मध्ये हनुमानवाडीचा महानगरपालिकेमध्ये समावेश करण्यात आला आहे. या ठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या रहिवाशांनी घरे बांधली आहेत. महानगरपालिकेला वेळोवेळी मालमत्ता कर भरला आहे. असे असले तरी येथील नागरिकांना घराचे उतारे देण्यात आलेले नाहीत.
कोणाकडे जावे हा प्रश्न
पिरनवाडी ग्राम पंचायतीकडे याबाबत विचारणा केली असता सदर भाग आता महानगरपालिकेकडे वर्ग करण्यात आला असून, महानगरपालिकेकडेच यासाठी पाठपुरावा करा, असे सांगण्यात आले आहे. महानगरपालिकेकडे चौकशी केली असता सदर भाग अद्याप महानगरपालिकेकडे नोंद नसल्याचे सांगण्यात येत आहे. अशा समस्येत अडकलेल्या नागरिकांनी आता कोणाकडे जावे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कागदपत्रांअभावी नागरिकांची गैरसोय
घरांचे उतारे मिळत नसल्याने वेगवेगळ्या कामांसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे उपलब्ध होणे कठीण झाले आहे. कर्ज काढण्यासाठी अथवा इतर कामांसाठी घरचा उतारा आवश्यक आहे. ही कागदपत्रे मिळत नसल्याने रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यामध्ये जातीने लक्ष घालून रहिवाशांची समस्या दूर करून न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी अश्विनी द•ाrकर, कृष्णा सुतार, तेजस्वी कांबळे, आप्पाजी साळुंखे, राजू गुरव, शंकर नाईक, मारुती चौगुले आदी उपस्थित होते.









