कारवाई करण्याची प्रादेशिक आयुक्तांकडे मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव
कणबर्गी येथील 61 क्रमांक स्कीममध्ये काही जणांना खरेदी करण्यास मुभा देण्यात आली आहे. असे असताना ती जमीन बुडा घेऊन स्कीम राबविण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, हे अत्यंत चुकीचे असून बुडाचे आयुक्त प्रीतम नसलापुरे यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. तसेच त्यांची बदली करावी, अशी मागणी कर्नाटक राज्य रयत संघटना यांच्यावतीने प्रादेशिक आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
बुडा आयुक्त प्रीतम नसलापुरे यांनी मोठा गैरप्रकार केला आहे. शेतकऱ्यांची त्यांनी सतावणूक केली आहे आणि एकाच ठिकाणी ते अनेक वर्षे काम करत आहेत. त्यांचे रिअल इस्टेटधारकांशी जवळचे संबंध आहेत. त्यातूनच त्यांनी बुडाची जमीन खरेदी करण्यास मदत केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
150 ते 300 कोटींचा घोटाळा
बुडाने सर्वे केले असताना 65 एकर जमिनीची खरेदी करण्यात आली आहे. हा प्रकार कसा घडू शकतो, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे. 150 ते 300 कोटींचा मोठा घोटाळा झाला आहे. रामतीर्थनगर, कणबर्गी स्कीममध्ये हा घोटाळा झाल्याचे या निवेदनात म्हटले आहे. तेव्हा या सर्व प्रकरणाची चौकशी करून तातडीने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी बबन मालाई, मारुती मालाई यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी केली आहे.









