कोसळलेली झाडे हटवा, पुलाची दुरुस्ती अन् रिफ्sलक्टर बसवण्याची तालुका पंचायत कार्यकारी अधिकाऱ्यांकडे मागणी
बेळगाव : 15 दिवसांपूर्वी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे अलतगा ते कडोली परिसरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात झाडे व फांद्या कोसळल्या आहेत. त्या अजूनही काढण्यात आल्या नाहीत. त्यामुळे प्रवास करताना नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याचबरोबर कंग्राळी येथील मार्कंडेय नदीच्या पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी अलतगा ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे. तालुका पंचायतचे कार्यकारी अधिकारी राजेश दनवाडकर यांना निवेदन देवून सदर मागणी केली आहे. कंग्राळी ते कडोली व महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यापर्यंत वादळी पावसामुळे अनेक झाडे कोसळली आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा येत आहे. काहींनी आपल्या हद्दीतील वृक्ष तोडून रस्ता खुला केला आहे तर काहींनी अद्यापही तशीच झाडे ठेवली आहेत. त्यामुळे प्रवास करताना अडथळा निर्माण होत आहेत. सध्या हा रस्ता सुरू असला तरी अद्यापही रस्त्यावरील पडलेली झाडे हटविली नसल्याने प्रवाशांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
पुलावरील उघड्या सळ्या बुजवण्याची मागणी
दरम्यान जी धोकादायक झाडे आहेत ती पावसापूर्वी हटविल्यास सोयीचे ठरणार आहे. अन्यथा मागील परिस्थिती प्रमाणेच वाहतुकीला अडथळा निर्माण होणार आहे. सध्या धोकादाक फांद्या हटविण्याची मोहीम हाती घेण्याचे आदेश बजावावेत, असेही या निवेदनात म्हटले आहे. महत्त्वाचे म्हणजे कंग्राळी खुर्द येथील पुलाचे काम निकृष्ट झाले आहे. या पुलावरील सळ्या बाहेर पडल्या असून अनेक वाहन चालकांना त्याचा त्रास होत आहे. यावर पुन्हा काँक्रिट घालून त्या सळ्या बुजवाव्यात, अशी मागणीही यावेळी केली आहे. निवेदन देण्यासाठी ग्राम पंचायत सदस्य चेतक कांबळे, देवस्थान पंच कमिटी अध्यक्ष चंद्रकांत धुडूम, सेक्रेटरी कल्लाप्पा चौगुले, भाऊराव गडकरी, गणपत सुतार, रुपेश चौगुले, वामन कंग्राळकर, कंत्राटदार महेश पाटीलसह नागरिक उपस्थित होते.
कंग्राळी-कडोली रस्त्यावर रिफ्लेक्टर बसवा, अपघात टाळा
बेळगावकडून महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यापर्यंत अनेक ठिकाणी रिफ्लेक्टर बसविण्यात आले नाहीत. त्यामुळे अपघात घडण्याच्या संख्येत वाढ झाली आहे. रिफ्लेक्टर नसल्यामुळे येथील समस्या वाढल्या आहेत. विशेष करून कंग्राळी पुलापासून ते कडोली कत्रीपर्यंत रिफ्लेक्टर नसल्याने वाहन चालकांना काय करावे हे समजत नाही. त्यामुळे या ठिकाणी रिफ्लेक्टर बसवून अपघात टाळावेत, अशी मागणीही यावेळी ग्रामस्थांनी केली आहे.









