महापालिकेच्या तत्परतेमुळे कंग्राळी खुर्द ग्रामस्थांतून समाधान
बेळगाव : रामनगर, महिला क्रॉस, ज्योतीनगर या परिसरात असलेल्या कचऱ्याची उचल महापालिकेने केली नाही. त्यामुळे कंग्राळी खुर्द ग्राम पंचायत सदस्यांनी गुरुवारी सकाळी उपमहापौरांना निवेदन दिले होते. त्यानंतर तातडीने गुरुवारी रात्री 9 वाजताच महापालिकेचे कचरा वाहन पाठवून कचऱ्याची उचल केली. यामुळे कंग्राळी ग्रामस्थांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. महानगगरपालिकेमध्ये रामनगर, ज्योतीनगर, मार्कंडेयनगर समाविष्ट करण्यात आला. त्यानंतर येथील कचऱ्याची उचल महापालिका करत होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून कचऱ्याची उचल केली नाही. त्यामुळे तो कचरा पावसाने कंग्राळी खुर्द गावच्या परिसरात वाहून जात होता. त्यामुळे दुर्गंधी पसरली होती. याचबरोबर रामनगर, ज्योतीनगर परिसरातील नागरिकांनाही त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कचऱ्याची उचल करावी, यासाठी गुरुवारी ग्राम पंचायत उपाध्यक्ष कल्लाप्पा पाटील, ग्राम पंचायत माजी अध्यक्ष यल्लाप्पा पाटील, सदस्य चेतक कांबळे, प्रशांत पाटील, वैजनाथ बन्नाळकर, राकेश पाटील, विनायक कम्मार यासह अन्य काही जणांनी उपमहापौर रेश्मा पाटील यांना निवेदन दिले होते. त्यानंतर रात्री 9 च्या दरम्यान वाहन पाठविण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रवीण पाटील, सिद्धाप्पा माळगी, दिनेश पाटील, सदस्य महेश धामणेकर त्या ठिकाणी उपस्थित राहून त्यांना मदत केली. महापालिकेच्या या तत्परतेमुळे कंग्राळी ग्रामस्थांतून आणि सदस्यांतून महापालिकेचे आभार मानण्यात आले.
उपमहापौर सकाळीच दाखल…
कचऱ्याची उचल करण्यासाठी कंग्राळी ग्रामस्थांनी गुरुवारी सकाळी निवेदन दिल्यानंतर रात्रीच कचऱ्याची उचल करण्यात आली. त्यामुळे तातडीने उपमहापौर रेश्मा पाटील यांचे आभार मानण्यात आले. त्यानंतर शुक्रवारी सकाळी 8 वाजता त्यांना बोलावून घेण्यात आले. त्यानंतर त्यांचा सत्कारदेखील करण्यात आला. यावेळी ग्राम पंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.









