ग्रा. पं. मध्ये निधीचा गैरवापर झाल्याची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी
बेळगाव : मुतगा ग्रा. पं. व्याप्तीत गेल्या पाच वर्षांत कोणतीही विकासकामे झालेली नाहीत. याबाबत पंचायतीला विचारले असता केंद्र व राज्य सरकारकडून कोणतेही अनुदान आले नसल्याचे सांगण्यात येत असून एकही ग्रामसभा घेण्यात आलेली नाही. सरकारकडून अनुदान आले असले तरी बनावट बिले सादर करून पैशांचा गैरवापर करण्यात आला आहे. त्यानुसार यामध्ये सहभागी असणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी मुतगा ग्रामस्थांनी केली. याबाबतचे निवेदन जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांना देण्यात आले. 2021 ते 2025 अखेर राज्य व केंद्र सरकारकडून ग्राम पंचायतीला किती अनुदान आले व यातून कोणकोणती विकासकामे करण्यात आली, याची चौकशी करण्यात यावी. 26 मार्च रोजी ग्रा. पं. कडे निवेदनाद्वारे 7 दिवसांच्या आत पाच वर्षांच्या विकासकामांचा तपशील देण्याची मागणी केली होती. मात्र याला केराची टोपली दाखविण्यात आली असून यावरूनच समजते की बेकायदेशीररित्या कार्यभार चालविण्यात आला आहे. त्यामुळे सरकारी निधीचा गैरवापर झाल्याची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी शांताराम पाटील, सागर पाटील, तुकाराम पाटील, सयाजी पाटील, गंगाराम केदार, मारुती चौगुला आदी उपस्थित होते.









