माडखोल केंद्रप्रमुख रामचंद्र वालावलकर यांचे प्रतिपादन
ओटवणे | प्रतिनिधी
माडखोल केंद्र शाळेचे पदवीधर शिक्षक विलास फाले यांना प्राप्त झालेला जिल्हा परिषदेचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार हा त्यांच्या आज पर्यंतच्या प्रामाणिक शैक्षणिक कार्याचा सन्मान आहे. तसेच विलास फाले यांना मिळालेला हा पुरस्कार म्हणजे माडखोल केंद्रशाळेचा गौरव आहे. या पुरस्कारामुळे त्यांच्यासह अनेक शिक्षकांना शैक्षणिक कार्यात उतुंग कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळेल. असे प्रतिपादन माडखोल केंद्रप्रमुख रामचंद्र वालावलकर यांनी केले.माडखोल केंद्र शाळेचे पदवीधर शिक्षक विलास फाले यांना जिल्हा परिषदेचा उत्कृष्ट, गुणवंत व आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल शाळेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या त्यांच्या गौरव सोहळ्यात केंद्रप्रमुख रामचंद्र वालावलकर बोलत होते. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आनंद राऊळ, मुख्याध्यापिका सौ. रश्मी सावंत, पालक लक्ष्मण देवणे, सौ. वेणू राऊळ, सौ. मंजिरी राऊळ, शिक्षक दीपक पंडित, सौ. स्वप्नजा खानोलकर, अंजली मुळीक, उन्नती धोंड आदी उपस्थित होते.यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आनंद राऊळ यांनी विलास फाले यांच्या शालेय परिसर स्वच्छता तसेच भौतिक सुविधांसाठी केलेल्या कार्याचे कौतुक करीत शालेय गुणवत्तेत व विद्यार्थ्यांना क्रीडा नैपूण्य प्राप्त करण्यासाठी केलेल्या कार्याचा उल्लेख केला. तसेच शैक्षणिक, सामाजिक कार्यातील उल्लेखनीय कामाबद्दल त्यांना मिळालेला हा सन्मान शाळेसाठी अभिमानास्पद असल्याचे सांगून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी सौ वेणूताई राऊळ यांनी विलास फाले यांच्या अध्यापनातील गुणवत्तेबाबत व शालेय कामकाजाचे कौतुक केले. यावेळी शालेय मुख्यमंत्री कु दूर्वा कोठावळे हिने फाले सरांच्या शिक्षणाच्या विविधांगी मार्गदर्शनाबाबत स्वतःचे सुंदर मत व्यक्त केले.यावेळी विलास फाले यांनी सर्वांचे आभार म्हणून मानून हा सन्मान माझा एकट्याचा नसून शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ पर्यायाने माडखोल गावाचा असल्याचे सांगितले. या सर्वांच्या प्रोत्साहनामुळेच शिक्षणासाठी सारख्या पवित्र क्षेत्रात काम करण्यास ऊर्जा मिळते. यापुढेही ही शाळा प्रगतीपथावर राहण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने कार्यरत राहण्याची ग्वाही दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दीपक पंडित यांनी तर आभार सौ. स्वप्नजा खानोलकर यांनी मानले.









