रितसर परवानगी घेतलेल्या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांवर नवीन अटी लादू नये
बेळगाव : गणेशोत्सवादरम्यान उपस्थित होणाऱ्या विविध मुद्यांसाठी लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळातर्फे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेऊन कुमार गंधर्व येथे त्यांना निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ज्या मंडळांनी गणेशोत्सवासाठी याअगोदर रितसर परवानगी घेतली आहे. त्या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना या वर्षात नवीन कोणत्याही प्रकारच्या अटी घालू नये. श्री विसर्जन मिरवणूक मार्गाचे रस्ते त्वरित दुऊस्त करावेत. सार्वजनिक गणेश मंडळांना सालाबादप्रमाणे देण्यात येणारी परवानगी एक खिडकीची योजना या मागच्या प्रमाणे तशाच ठेवण्यात याव्यात. मिरवणूक संपेपर्यंत वाद्य वाजवण्यास परवानगी देण्यात यावी. ज्या मंडळांच्या गणेश उत्सवाचे आगमन सोहळे असतील त्या मंडळाच्या ठिकाणच्या वाहतूक मार्गात बदल करण्यात यावेत व त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देण्यात यावा. गणेश मंडळांना परवानगी देतांना कागदपत्रांसाठी अडवणुकीचे धोरण न बाळगता सर्व परवानग्या या एक खिडकी योजनेअंतर्गत देण्यात याव्यात. लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष विजय जाधव, नगरसेवक गिरीश धोंगडी, हेमंत हावळ, सुनिल जाधव, रवी कलघटगी, नितीन जाधव, प्रवीण पाटील, राजकुमार खटावकर, अजित जाधव, आदित्य पाटील, अऊण पाटील, गजानन हंगिरगेकर आदी उपस्थित होते.
मिरवणूक मार्गावरील जीर्ण वृक्षांची काटछाट करा
गणेशोत्सव मिरवणूक मार्गावरील जीर्ण झालेल्या वृक्षांची दखल घेऊन काटछाट करून होणारे संभव धोके टाळावेत. ग्रामीण भागातून येणाऱ्या भक्तांना विशेष बस सेवा पुरवावी. मंडळांच्या अडचणी दूर करण्यासाठी पोलीस आयुक्तालयातर्फे एक अधिकारी नेमावा, जेणकरुन मिरवणूक सुरळीत पार पाडण्यास मदत होईल. अशा विविध मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.









