लडाखमधील न्योमा बेल्टमध्ये एअरफील्डची होणार निर्मिती
वृत्तसंस्था/लेह
भारतीय सैन्याने आर्टिफिशियल इंटेलिजेन्सच्या वापरावर लक्ष केंद्रीत पेल आहे. याचमुळे सैन्याने चीन अ्न पाकिस्तानशी मुकाबला करण्यासाठी जम्मू-काश्मीर तसेच लडाखमधील सीमेवर स्वदेशी ड्रोन तैनात केले आहेत. तर दुसरीकडे बीआरओकडून पूर्व लडाखच्या सामरिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण न्योमा बेल्टमध्ये 218 कोटी रुपये खर्चुन वायुतळ तयार केला जाणार आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते 12 सप्टेंबर रोजी या कार्याचा शुभारंभ होणार आहे. शत्रूचा मुकाबला करणे किंवा त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी उत्तर तसेच पश्चिम सीमांवर अत्याधुनिक ड्रोन तैनात करण्यात आले आहेत. हे ड्रोन देशातच तयार करण्यात आले आहेत. लॉजिस्टिक ड्रोन आणि ऑटोनॉमस व्हेईकल्सवरून मोठ्या प्रमाणात संशोधन झाल्याची माहिती नॉर्दर्न कमांडचे चीफ ऑफ स्टाफ लेफ्टनंटर जनरल अनिंद्य सेनगुप्ता यांनी दिली आहे. आम्ही लॉजिस्टिक ड्रोनचाही वापर करत आहोत. अत्याधिक उंचीवरील क्षेत्रांमध्ये ड्रोनच्या वापरावरून विविध प्रकारची आव्हाने आहेत. अत्याधिक उंचीवर स्थापन चौक्यांपर्यंत लॉजिस्टिक ड्रोनद्वारे वजन वाहून नेऊ शकतो असे सेनगुप्ता यांनी सांगितले आहे. सैन्याने काही शस्त्रास्त्रांची खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून यात एएसएमआय नावाची यंत्रणा देखील सामील आहे. एएसएमआय हे 2 शस्त्रास्त्रांचे मिश्रण आहे. आम्ही ही यंत्रणा यावेळी सिम्पोजियममध्ये प्रदर्शित करणार आहोत, असे नॉर्दर्न कमांडचे मेजर जनरल एसबीके. सिंह यांनी सांगितले आहे.
न्योमा स्टॅटेजिक बेल्ट
13,400 फुटांच्या उंचीवरील न्योमा हे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून सुमारे 46 किलोमीटर अंतरावर आहे. न्योमा अॅडव्हान्स्ड लँडिंग ग्राउंडचा वापर 2020 पासून चीनसोबत सुरू असलेल्या वादादरम्यान जवानांची ने-आण तसेच रसदपुरवठ्यासाठी केला जात आहे. तेथे चिनूक हेवी-लिफ्ट हेलिकॉप्टर आणि सी-130 जे स्पेशल ऑपरेशन एअरक्राफ्टचा वापर करण्यात आला होता. न्योमा बेल्ट 218 कोटी रुपयांच्या निधीतून विकसित केला जाणार आहे. हे एअरफील्ड तयार झाल्याने लडाखमध्ये हवाई मूलभूतसुविधांना चालना मिळणार आहे. तसेच उत्तरेकडील सीमांवर वायुदलाच्या क्षमतेत वृद्धी होणार आहे.









