रेड हेल्थतर्फे 109 रुग्णालयांमध्ये 5 हजार रुग्णवाहिका कार्यरत
बेळगाव : केएलई संस्थेचे डॉ. प्रभाकर कोरे रुग्णालय-संशोधन केंद्र व रेड हेल्थ यांनी एकत्र येऊन उत्तर कर्नाटक, दक्षिण महाराष्ट्र व गोव्यातील जनतेला सेवा देण्याचे कार्य हाती घेतले आहे. रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका (अॅम्ब्युलन्स) अत्यंत उपयोगी ठरते. त्या अनुषंगाने बुधवारी (दि. 10) डॉ. कोरे रुग्णालयाच्या आवारात रुग्णवाहिकेचे उद्घाटन रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. (कर्नल) एम. दयानंद यांनी निशाण दाखवून केले. याप्रसंगी डॉ. दयानंद म्हणाले की, ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीची आरोग्य सेवा उपलब्ध होण्यासाठी रुग्णवाहिका अत्यंत उपयोगी ठरते.
आरोग्य सेवा सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक योजना असल्या तरी अत्यंत गरजेच्या वेळी रुग्णवाहिकाच उपयोगी ठरते. दर्जेदार वैद्यकीय सेवेबरोबर रुग्णांना जीवदान मिळवून देण्यास रुग्णवाहिका उपयोगी ठरणार आहे. अत्यंत गरजेच्या वेळी 1099 वर संपर्क साधल्यास (कॉल) रुग्णवाहिका दाखल होणार आहे. डॉ. कोरे रुग्णालयामध्ये अत्याधुनिक वैद्यकीय सेवा व रुग्णवाहिका उपलब्ध आहे. आता ‘रेड हेल्थ’चे सहकार्य घेऊन आणखी अधिक वैद्यकीय सेवा देण्याचे रुग्णालयाचे प्रयत्न आहेत, असे डॉ. दयानंद म्हणाले. रेड हेल्थचे उपाध्यक्ष प्रशांत अगरवाल यांनी रुग्णवाहिकेच्या सेवेबाबत माहिती दिली.
मागील 9 वर्षांपासून देशाच्या विविध भागात रुग्णवाहिका देण्यात येत आहेत. देशातील 109 रुग्णालयांना सेवा देण्यात येत असून 5 हजारहून अधिक रुग्णवाहिकांमार्फत कार्य सुरू आहे. आता केएलई संस्थेबरोबर कार्य करण्यात येत आहे. तातडीची वैद्यकीय सेवा सुधारण्यासाठी रुग्णवाहिका रुग्णालयांना सहकार्य करणार आहे. अत्याधुनिक रुग्णवाहिका ही रुग्णांना त्वरित आणि सुरक्षितपणे रुग्णालयात दाखल करण्यास उपयोगी ठरेल. डॉ. कोरे रुग्णालयाच्या क्लिनिकल सर्व्हिसचे संचालक डॉ. माधव प्रभू, वैद्यकीय अधीक्षक डॉ. आरिफ मालदार, कर्नल श्रीनिवास, डॉ. बसवराज बिज्जरगी, नवीन एन., विनय बेद्रे आदी यावेळी उपस्थित होते.









