प्रभावती मास्तमर्डी यांच्या प्रचार फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद : महागाई वाढल्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाल्याचा आरोप

बेळगाव : कर्नाटकातील भाजप सरकारला जनता कंटाळली आहे. भाजपमुळे देशाची व्यवस्था बिकट झाली आहे. महागाई वाढल्यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. त्यामुळे लोकांना आता बदल हवा आहे. सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी काँग्रेसला मत देऊन प्रचंड मतांनी निवडून देऊन विधानसभेत पाठवा. जाहिरनाम्यात दिलेल्या सर्व आश्वसनांची पूर्तता केली जाईल. त्यामुळे कर्नाटकात काँग्रेसची सत्ता येणार आहे. यासाठी प्रभावती मास्तमर्डी यांना निवडून द्या, असे प्रतिपादन माजी मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केले. बेळगाव दक्षिणमधील काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार प्रभावती मास्तमर्डी यांची शहापूर येथील छत्रपती शिवाजी उद्यानात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून भव्य प्रचारफेरीला सुरुवात झाली. जगद्गुरु बसवेश्वर सर्कल, खासबागमार्गे, दक्षिण काँग्रेस कार्यालयासमोर या फेरीची सांगता झाली. सर्व नागरिकांनी घराबाहेर पडून निवडणुकीचा प्रचार लक्षपूर्वक ऐकला. राज्याला काँग्रेस पक्षाची नितांत गरज असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. या सभेत काँग्रेस पक्षाचे नेते, शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. काँग्रेस पक्षाला सत्तेवर आणण्यासाठी सर्वांनी परिश्रम घेतले पाहिजे. भाजपने नागरिकांना खोटी आश्वासने दिली आहेत. प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये देणार असे भाजपने सांगितले होते. नोटा बंदीमुळे सर्वसामान्यांचे नुकसान झाले. जीएसटीमुळे व्यापारी वर्ग त्रस्त झाला, असे सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. भाजप केवळ जातीचे राजकारण करते त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. प्रचारसभेला उपस्थित कार्यकर्ते व महिलांनी उमेदवार प्रभावती मास्तमर्डी यांना निवडून आणू, असे आश्वासन दिले.









