बेळगाव : राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष अब्दुल अजीम यांनी गुरुवार दि. 26 रोजी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहाला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. आपल्या या भेटीत अब्दुल अजीम यांनी कारागृहातील बहुतेक विभागांना भेटी देऊन कैद्यांच्या समस्या जाणून घेतल्या. कारागृहाची पहाणी केल्यानंतर कैद्यांसाठी कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. कायद्याच्या चौकटीत अल्पसंख्याक आयोगाकडून कैद्यांना सर्व सुविधा पुरविण्यात येतील. कारागृहात शिस्त व संयमाने रहावे. कारावास तात्पुरता असतो. एक ना एक दिवस तेथून बाहेर पडावे लागते. त्यामुळे कारावास अवधीत आपले जीवन समृद्ध बनवण्याचा प्रयत्न करा, असा सल्ला अब्दुल अजीम यांनी कैद्यांना दिला. कारागृहाचे मुख्य अधीक्षक कृष्णकुमार यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. कैद्यांना नियमानुसार ज्या सुविधा दिल्या जातात, त्या आपण पुरवत आहोत. कैद्यांनी भूतकाळाचा विचार सोडावा. पुढील जीवन उत्तमरित्या कसे जगता येईल, यासाठी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले. यावेळी कारागृहाचे साहाय्यक अधीक्षक कृष्णमूर्ती, प्रशासकीय अधिकारी बी. एस. पुजारी, सय्यद जाफरी, मुक्तार पठाण, शाहिद मोमीन, अधिकारी, कर्मचारी व कैदी उपस्थित होते.
Previous Articleबंगारप्पानगर शिरवाड येथे कँडल मार्च
Next Article राणी चन्नम्मा विद्यापीठ इमारतीचे बांधकाम असमाधानकारक









