खानापूर : राज्य लोकायुक्त प्रकाश नाडगेर यांनी खानापुरातील तहसीलदार कार्यालय, उपनोंदणी कार्यालय, सरकारी दवाखाना, नगरपंचायत यासह इतर कार्यालयांना भेटी देऊन कामकाजाची पाहणी केली. तसेच नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. अधिकाऱ्यांना कामकाजासंबंधी सूचना केल्या. राज्य लोकायुक्त प्रकाश नाडगेर यांच्या पथकात आनंद तिरकन्नावर, अन्नपूर्णा, संदीप पुजारी, मंजुनाथ डी या अधिकाऱ्यांचा सहभाग होता. ही भेट पूर्वनियोजित असल्याने सर्व कार्यालयात अधिकारी वेळेवर उपस्थित होते.
सकाळी सर्वप्रथम उपनोंदणी कार्यालयाला भेट देऊन तेथील कामकाजाची पहाणी केली. तसेच आपल्या कामासाठी उपस्थित राहिलेल्या नागरिकांना प्रश्न विचारून माहिती घेतली. त्यानंतर तहसीलदार कार्यालयाला भेट दिली. तेथून सरकारी दवाखान्याला भेट देऊन सर्व विभागाची पाहणी केली आणि सामान्य नागरिकांना उपचार व्यवस्थित मिळतात की नाही याबाबत माहिती घेतली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी महेश किवडसनावर यांनी संपूर्ण दवाखान्यातील सेवेसंबंधी माहिती दिली. यानंतर त्यांनी नगरपंचायत कार्यालयाला भेट देऊन तेथील कामकाजाची पहाणी केली आणि अधिकाऱ्यांना कामकाजासंबंधी सूचना केल्या. यानंतर तालुक्यातील ग्रामपंचायतींनाही भेट देऊन पाहणी केली आहे.









