पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूट, साखर आयुक्तालय, राज्य सहकारी साखर संघ आणि वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या 4 व 5 जून रोजी मांजरी येथील व्हीएसआयच्या परिसरात राज्यस्तरीय साखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत साखर उद्योगातील विविध प्रश्न, त्यावरील उपाययोजना, भविष्यातील आव्हाने यावर ऊहापोह होणार असल्याची माहिती साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर आणि व्हीएसआयचे महासंचालक शिवाजीराव देशमुख यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
4 जूनला परिषदेच्या उद्घाटनास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रित करण्यात आले असून, अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते व व्हीएसआयचे अध्यक्ष शरद पवार असतील. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या परिषदेत मंत्री बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, सतेज पाटील, शंभूराजे देसाई, विश्वजीत कदम, माजी मंत्री विजयसिंह मोहिते पाटील, हर्षवर्धन पाटील, दिलीपराव देशमुख, आमदार बबनराव शिंदे, अरुण लाड, रोहित पवार व अन्य मान्यवर सहभागी होतील. या परिषदेचा समारोप राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. रवींद्र एनर्जीचे संचालक नरेंद्र मुरकुंबी हे समारोप सत्राचे प्रमुख वक्ते असतील. त्यानंतर 5 जून रोजी दुपारी 3 ते सायंकाळी 5 यादरम्यान पवार यांच्या हस्ते व्हीएसआयकडून साखर उद्योगातील उत्कृष्ट कार्यक्षमतेसाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांचे वितरण होईल. 2019-20 आणि 2020-2021 मध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कारखान्यांना या वेळी गौरविण्यात येणार आहे.