अहमदनगर येथील छ. शिवराय केसरी कुस्ती स्पर्धा
औंध प्रतिनिधी
अहमदनगर येथील वाडिया पार्क येथे छबू पैलवान क्रीडा नगरीत सुरू असलेल्या राज्यस्तरीय निमंत्रित छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेत माती गटातील अंतिम फेरीत यावर्षीचा उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड आणि महान भारत केसरी सिकंदर शेख आज रविवारी सायंकाळी परस्परांशी भिडणार आहेत. महाराष्ट्रातील तमाम कुस्ती शौकिनांचे लक्ष या कुस्तीकडे लागले आहे
यंदा पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत माती गटातील अंतिम फेरीत गंगावेस तालमीचा सिकंदर शेख विरुद्ध आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात अर्जूनवीर काका पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत असलेला महेंद्र गायकवाड यांच्यात झालेल्या कुस्तीला वादाचे गालबोट लागले होते. यामुळे कुस्ती क्षेत्रात अनेक दिवस वादाचा धुरळा उडत होता. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेनंतर राज्यात झालेल्या कुस्ती मैदानात अनेकांनी ही कुस्ती जोडण्याचा प्रयत्न केला पण दोन्ही मल्ल समोरासमोर आले नव्हते. दोघेही मूळचे सोलापूर जिल्ह्यातील आहेत मात्र सिकंदर राज्यस्तरीय स्पर्धेत वाशीम जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतो. तर महेंद्र सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतो.
अहमदनगर जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेत योगायोगाने हे दोन्ही मल्ल पुन्हा समोरासमोर आले आहेत. राज्याच्या कुस्ती क्षेत्रातील तमाम कुस्ती शौकिनांचे आजच्या या माती गटातील लढतीकडे लक्ष लागले आहे. तसेच गादी गटात महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आणि इंदापूर तालुक्यातील माऊली कोकाटे हे दोन्ही मल्ल परस्परांशी भिडणार आहेत. माती आणि गादी गटातील विजेते पैलवान छत्रपती शिवराय केसरी किताबासाठी लढणार आहेत. विजेत्या मल्लांना अर्धा किलो सोन्याची गदा बक्षीस देण्यात येणार आहे त्यामुळे या सोनेरी गदेचा मालक कोण होणार? याची देखील तमाम कुस्ती शौकिनांना उत्सुकता लागली आहे.








