प्रतिनिधी / बेळगाव
कर्नाटक राज्य ऑर्थोपेडिक संघटना व बेळगाव ऑर्थोपेडिक सर्जन सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने, बिम्स आणि जेएनएमसी यांच्या सहकार्याने दि. 3 ते 5 फेब्रुवारी दरम्यान कोआकॉन ही ऑर्थोपेडिक सर्जन्सची राज्यस्तरीय परिषद भरत आहे. ‘इंडीजीनीअस इन्व्हेंशन फॉर आत्मनिर्भर ऑर्थोपेडिक्स’ या विषयावर ही परिषद होणार आहे. दि. 3 रोजी सायंकाळी 5 वाजता डॉ. एच. बी. राजशेखर हॉल, केएलई इन्व्हेंशन सेंटर येथे परिषदेचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती केओएच्या अध्यक्ष डॉ. अश्विनी कुमारसिंग यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या परिषदेत आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील ऑर्थोपेडिक सर्जन सहभागी होणार आहेत. अलीकडे बैठ्या जीवनशैलीमुळे विविध प्रकारचे आजार वाढत आहेत. शरीराची हालचाल होणे आवश्यक आहे, ज्यामुळे विविध प्रकारचे अपंगत्व रोखता येते. याच हेतूने संघटनेने हाडे आणि सांधे सप्ताह (बोन अँड जॉईंट वीक) राज्यभरात साजरा करण्यात येणार आहे.
परिषदेमध्ये चर्चासत्र, व्याख्याने आणि विविध कार्यशाळा होणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी केओएचे सचिव डॉ. भारत राजू, आयोजन प्रमुख डॉ. एस. व्ही. उदपुडी, आयोजन सचिव डॉ. अनिल पाटील, खजिनदार डॉ. पुनीत चमकेरी उपस्थित होते.









