‘इंडिया’च्या बैठकीत 28 पक्षांचा सहभाग : मुंबईत गुरुवारी पार पडली अनौपचारिक बैठक : जागावाटप अन् निमंत्रक नेमण्याच्या मुद्द्यावर आज चर्चा शक्य
वृत्तसंस्था /मुंबई
भाजपविरोधी पक्षांची आघाडी इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुसिव्ह अलायन्सची (इंडिया) तिसरी बैठक गुरुवारी सुरू झाली असली तरीही ती शुक्रवारपर्यंत चालणार आहे. इंडियाच्या या बैठकीत प्रत्येक राज्याच्या स्तरावर जागावाटपासाठी समिती नेमण्याचा विचार पुढे आला आहे. तसेच 30 सप्टेंबरपर्यंत लोकसभा निवडणुकीसाठी तात्पुरत्या स्वरुपाचे जागावाटप करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. इंडिया या आघाडीत सामील अनेक पक्ष हे कित्येक राज्यांमध्ये परस्परांच्या विरोधात राजकीय दृष्ट्या लढत असल्याने जागावाटप हाच मुद्दा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. तर इंडियाच्या बैठकीत आघाडीचा लोगो अन् निमंत्रकाचे नाव समोर येऊ शकते. शिवसेना (युबीटी) अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी इंडियात सामील पक्षांच्या नेत्यांसाठी गुरुवारी प्रीतिभोजनाचे आयोजन केले होते. या बैठकीत 28 पक्षांचे सुमारे 63 नेते सामील होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. या बैठकीसाठी मुंबईत पोहोचलेले काँग्रेस
इंडियाच्या बैठकीत कुठला पक्ष, कुठल्या राज्यात किती जागा लढविणार याविषयी एक रुपरेषा तयार केली जाण्याची शक्यता आहे. या आघाडीत सामील पक्ष हे अनेक राज्यांमध्ये परस्परांचे विरोधक आहेत. इंडियाच्या बैठकीसाठी राजद प्रमुख लालूप्रसाद यादव, त्यांचे पुत्र तेजस्वी यादव हे 29 ऑगस्ट रोजी मुंबईत दाखल झाले होते. तर बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी 30 ऑगस्ट रोजी मुंबईत पोहोचल्या होत्या. सप प्रमुख अखिलेश यादव आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, रालोद प्रमुख जयंत चौधरी, पीडीपी अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती, काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी गुरुवारी मुंबईत दाखल झाल्या आहेत. तसेच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, माकपचे महासचिव सीताराम येच्युरी, भाकपचे महासचिव डी. राजा देखील गुरुवारी पार पडलेल्या अनौपचारिक बैठकीत सामील झाल्याचे समजते. देशाच्या तरुणाईला रोजगार हवा आहे. लोकांना महागाईपासून मुक्ती हवी आहे. परंतु मोदी सरकार केवळ एका व्यक्तीसाठी काम करत आहे. इंडिया आघाडी देशाच्या 140 कोटी लोकांसाठी असल्याचे वक्तव्य दिल्लीचे मुख्यमंत्री अन् आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केले आहे.
‘आप’कडून स्पष्टीकरण
पंतप्रधान पदासाठी आम आदमी पक्ष या आघाडीत सामील झालेला नाही. अरविंद केजरीवाल हे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाहीत. उज्ज्वल भारताचा ब्ल्यूप्रिंट तयार क्हावा म्हणून आम्ही या आघाडीत सामील झालो आहोत असा दावा आप खासदार राघव चड्ढा यांनी गुरुवारी केला आहे.
खासदार निवडतील पंतप्रधान
सांप्रदायिक शक्तींशी लढण्यासाठी आम्ही एकजूट झालो आहोत. या देशाच्या लोकांना आघाडी हवी आहे. पंतप्रधान निवडण्याची प्रक्रिया कोणती आहे हे प्रत्येक जण जाणतो. निवडून आलेले खासदार पंतप्रधान निवडणार आहेत. आमची ही आघाडी पंतप्रधान मोदींपेक्षा अधिक प्रामाणिक असणार आहे असे उद्गार बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी काढले आहेत.
11 सदस्यीय समन्वय समिती
मुंबईत होणाऱ्या तिसऱ्या बैठकीत जागावाटपावरून चर्चा होणार आहे. तसेच 11 सदस्यीय समन्वय समितीला अंतिम रुप दिले जाणार आहे. या समितीत काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, आप, संजद, राजद, शिवसेना (युबीटी), राष्ट्रवादी काँग्रेस, झामुमो, समाजवादी पक्ष आणि माकपचा प्रत्येकी सदस्य असणार आहे. आघाडीत सामील अन्य छोट्या पक्षांना समितीत स्थान मिळणार नाही.
संयुक्त कार्यालयाची घोषणा शक्य
2024 ची लोकसभा निवडणूक पाहता संयुक्त निदर्शने आणि सभा आयोजित करण्यासाठी एक अन्य समितीचीही घोषणा होण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षांदरम्यान उत्तम ताळमेळ राखण्यासाठी एक संयुक्त कार्यालयही स्थापन केले जाऊ शकते. बैठकीदरम्यान सर्व पक्षांमधील परस्पर मतभेद दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल. विशेषकरून थेट राजकीय लढाई असलेल्या राज्यांवर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. केरळमध्ये काँग्रेस विरुद्ध डावे, पश्चिम बंगालमध्ये डावे विरुद्ध तृणमूल काँग्रेस, पंजाबमध्ये काँग्रेस विरुद्ध आप, दिल्लीत आप विरुद्ध काँग्रेस, उत्तर प्रदेशात सप विरुद्ध काँग्रेस आणि जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपी विरुद्ध नॅशनल कॉन्फरन्स असे चित्र दिसून येते. अशा स्थितीत हा राजकीय विरोध बाजूला सारण्याचे आव्हान या आघाडीसमोर आहे.
2014 मध्ये आलेले 2024 मध्ये जाणार
केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपने जनतेचा विश्वासघात केला असल्याने 2024 मध्ये हा पक्ष सत्तेवरून दूर होणार आहे. इंडिया आघाडीच्या बैठका सातत्याने होत असल्याने जनतेत यामुळे विश्वासाचे वातावरण तयार होणार असल्याचा दावा सप प्रमुख अखिलेश यादव यांनी केला आहे.
वायएसआरटीपी प्रमुखांनी घेतली गांधींची भेट
मुंबईत विरोधी पक्षांच्या आघाडीच्या बैठकीपूर्वी वायएसआरटीपी प्रमुख वाय. एस. शर्मिला यांनी गुरुवारी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेत त्यांच्याशी अनेक राजकीय मुद्द्यांवर चर्चा केली असल्याचे शर्मिला यांनी सांगितले आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे काउंटडाउन सुरू झाल्याचे सांगू इच्छिते असे त्यांनी म्हटले आहे.
राहुल गांधी अन् बॅनर्जी यांच्यात बैठक
मुंबईतील इंडियाच्या तिसऱ्या बैठकीपूर्वी दिल्लीत राहुल गांधी आणि ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्यात गुप्त बैठक झाली आहे. या दोन्ही नेत्यांनी बंगालमध्ये एकत्र येत निवडणूक लढविण्यावर चर्चा केल्याचे समजते. तर बंगालमध्ये डाव्या पक्षांनी तृणमूल काँग्रेससोबत आघाडी शक्य नसल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे.
अदानी-भाजपमध्ये आर्थिक हितसंबंध : राहुल गांधी यांचा आरोप
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळचे उद्योगपती गौतम अदानी हे विविध ठिकाणी भरमसाट गुंतवणूक करीत असून हा पैसा आला कुठून, असा प्रश्न करत भारतातला पैसा बाहेर गेला आणि पुन्हा भारतात आला. तो पैसा अदानी यांच्या कंपन्यांमध्ये गुंतविण्यात आला, असा गौप्यस्फोट काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केला आहे. तसेच अदानी समूह आणि भाजपमध्ये आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. इंडिया आघाडीच्या बैठकीच्या आधी पत्रकार परिषद घेत विविध उद्योगांमध्ये अदानी यांनी केलेल्या गुंतवणुकीवरून आक्रमक धोरण स्वीकारले.
दी गार्डियन आणि फायनान्शियल टाईम्स या दोन वफत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वफत्तांचा हवाला देत 1 बिलियन डॉलर अदानीमार्फत परदेशात गेले. भारताबाहेर गेलेला तो पैसा कोणाचा होता, याचा तपास होणे गरजेचे आहे. ईडी, सीबीआय या तपास यंत्रणांनी चौकशी करणे भाग आहे. अदानी प्रकरणाची मोदींनी जेपीसीमार्फत (संयुक्त संसदीय समिती) चौकशी करणे आवश्यक आहे. मात्र अदानीप्रकरणी मोदी मौन बाळगून असल्याचा संशय राहुल गांधी यांनी व्यक्त केला.
बाहेर गेलेला पैसा कोणाचा आणि अदानी देशातील मालमत्ता कोणाच्या पैशाने विकत घेतात असा प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला. पंतप्रधान मोदी केवळ एका माणसाला संरक्षण का देतात असा प्रश्न करत गौतम अदानी यांच्या कंपनीत चिनी व्यक्तीची गुंतवणूक आहे, यामुळे संसदेच्या संयुक्त समितीमार्फत चौकशी करावी अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.
राहुल गांधी म्हणाले की, अदानी यांच्या कंपन्यांमध्ये काही लोकांनी छुपी गुंतवणूक केली आहे. जवळपास 1 अब्ज डॉलर्स हे अदानी यांच्या कंपनीच्या माध्यमातून बाहेर वेगवेगळ्या देशांमध्ये गेले आणि नंतर ते परत आले. त्या पैशातूनच आता अदानी हे विमानतळ आणि इतर प्रकल्प राबवत आहेत. हा पैसा कुणाचा आहे? अदानींचा आहे की आणखी कुणाचा? दुसऱ्या कुणाचा असेल तर ते कोण आहेत याची चौकशी करावी. गौतम अदानी यांचे बंधू विनोद अदानी हे या मागचे मास्टरमाईंड आहेत, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. ते म्हणाले की, अदानी यांच्या कंपनीमध्ये नासर अली शाबान अहली आणि चांग चुंगलिंग यांची गुतंवणूक आहे. अदानी जर भारतात विकास प्रकल्प राबवतात तर त्यांच्या कंपनीमध्ये चिनी व्यक्तीचा पैसा कसा, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. अदानींची कंपनी ही संरक्षण क्षेत्रात काम करत आहे, मग चिनी व्यक्तीची गुंवतणूक त्यामध्ये कशी काय? गौतम अदानी यांच्या कंपनीमध्ये दोन व्यक्तींची गुंतवणूक असून ती का आहे, याची चौकशी केली पाहिजे. तसेच अदानी यांना क्लीनचिट देणाऱ्या व्यक्तीचाही यात सहभाग असल्याचा त्यांनी आरोप केला. हे भारताच्या प्रतिष्ठेला बाधा आणणारे असल्याचेही राहुल गांधी म्हणाले.
वीस हजार कोटींचा मालक कोण?
गौतम अदानी यांच्या अनेक बनावट कंपन्या असून, त्यांनी सेबीच्या सर्व नियमांचे उल्लंघन केल्याचा खुलासा अमेरिका, इंग्लंडसह भारतातील अनेक वर्तमानपत्रातून झाला आहे. त्यामुळे अदानींच्या कंपन्यांमध्ये सापडलेल्या 20 हजार कोटींचा मालक कोण, असा प्रश्न करत काँग्रेस प्रवक्ते जयराम रमेश यांनी या प्रकरणाची संसदेच्या संयुक्त समिती मार्फत चौकशी करावी, अशी मागणी केली. इंडियाच्या बैठकीसाठी मुंबईत येताच जयराम रमेश यांनी पक्षाचे प्रदेश मुख्यालय टिळक भवनमध्ये पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. 2014 मध्ये ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन येथे नववे जी-20 शिखर संमेलन झाले होते. या संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशाविरोधात, काळा पैसा जमा करणाऱ्यांच्या विरोधात तसेच बनावट कंपन्या विरोधात आवाज उठवला होता. याविरोधात सर्वांनी एकत्र काम करण्याचे आवाहन त्यांनी केले होते. परंतु, आता पुढील आठवड्यात अठरावे जी-20 संमेलन भारतात होत आहे. तत्पूर्वीच सर्व वर्तमानपत्रांमध्ये गौतम अदानी यांनी बनावट कंपन्याचा उपयोग केला असून सेबीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे प्रसिद्ध झाले आहे, याकडे रमेश यांनी लक्ष वेधले. गुंतवणुकीत पारदर्शकता नाही, बनावट कंपन्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला गेला. नियमांचे उल्लंघन झाले हे सरकारला माहीत असूनही देशातील तपास संस्था कुचकामी ठरल्याचा आरोपही रमेश यांनी केला.









