पत्रकार परिषदेत एम. एम. कांबळे यांची माहिती
बेळगाव : शालेय शिक्षण विभाग आणि श्री सिध्देश्वर पदवीपूर्व कॉलेज यांच्या मार्फत 31 रोजी शहरात प्रथमच राज्यस्तरीय बॉक्सिंग क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते सकाळी 9.30 वाजता या क्रीडा स्पर्धांना प्रारंभ होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आसीफ सेठ असणार आहेत, अशी माहिती पदवीपूर्व शिक्षण विभागाचे उपनिर्देशक एम. एम. कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या क्रीडा स्पर्धेसाठी 20 जिल्ह्यातील 140 क्रीडापटूंनी आपल्या नावाची नोंद केली आहे. शिवाय 19 वर्षाखालील विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा चालणार आहे. नेहरुनगर येथील स्पोर्टस् हॉस्टेलच्या मैदानावर इनडोअर या स्पर्धा होणार आहेत. बाहेरुन येणाऱ्या विद्यार्थ्यांना समिती कॉलेजमध्ये राहणे व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. ही स्पर्धा नागनूर रुद्राक्षीमठाचे प.पू. डॉ. अल्लमप्रभू महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात होणार आहे. या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून महिला व बाल कल्याण खात्याच्या लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार अशोक पट्टण, कर्नाटक राज्य दिल्लीचे मुख्य प्रतिनिधी प्रकाश हुक्केरी उपस्थित राहणार आहेत. यावेळी जी. एम. पाटील, प्रभू शिवनायकर, बी. आय. हन्नूर, आर. जी. मठ, एम. बी. मरेण्णावर, जी. एस. कांबळे आदी उपस्थित होते.









