पुणे / प्रतिनिधी :
महाविकास आघाडीच्या काळात मराठा समाजाला दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही. त्यामुळे याबाबत जाणकारांचे मत विचारात घेऊन राज्य सरकार आरक्षण देण्याचा प्रयत्न करेल. मुख्यमंत्री स्वतः यावर लक्ष ठेवून आहेत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.
पवार म्हणाले, सरकार मराठा आरक्षणावर काम करत आहे. शुक्रवारी रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीला बहुतांश मंत्री उपस्थित होते. मात्र, मी शहराबाहेर असल्याने बैठकीला उपस्थित राहू शकलो नाही. आंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील व मराठा आंदोलक यांचे शिष्टमंडळ मुंबईला गेले होते. सह्याद्रीवर शिष्टमंडळाने सरकारसोबत चर्चा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बैठकीत उपस्थित होते. रात्री उशिरापर्यंत बैठक सुरु होती. मला जास्त काही माहिती घेता आली नाही. मनोज जरांगे यांच्याशी मुख्यमंत्री बोलत आहेत. याप्रकरणी शासकीय अध्यादेशदेखील काढला. पण, त्यांना तो मान्य नाही. सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. सरकारने निर्णय घेतला, तरी शेवटी मनोज जरांगे यांना निर्णय पटला पाहिजे. आम्ही त्यांना समजवण्यात कमी पडतो आहोत. कायद्याच्या अंतर्गत निर्णय घेण्याचा सरकार प्रयत्न करत आहे.
राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत बोलताना ते म्हणाले, आता हवामान खात्याने पाऊस चांगला पडणार असल्याचे म्हटले आहे. पुणे शहरालगत असलेल्या धरणांमध्ये पाणीसाठा वाढला असून, पाणीसाठय़ात आणखी वाढ होणार आहे. मात्र, राज्यात अनेक ठिकाणी समाधानकारक पाऊस नाही. अनेक धरणे भरलेली नाहीत. काही ठिकाणी पाऊस झाला असला, तरी अनेक ठिकाणी खरीप पिके गेली आहेत. पीकविम्याचे पैसे शेतकऱ्यांना लवकर मिळावेत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
मराठी शाळा, इंग्रजी शाळा असा भेदभाव करण्यापेक्षा राज्यातील शैक्षणिक धोरण सुधारले पाहिजे, असे मला वाटते. जे मराठी शाळेसाठी आंदोलन करतात, त्यांची मुले इंग्रजी माध्यमांच्या शाळात शिकतात, असा टोला त्यांनी नाव न घेता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला. आपण बदल स्वीकारला पाहिजे. मराठी शाळेतदेखील इंग्रजीचे उत्तम शिक्षण मिळत असल्याची प्रतिक्रिया पवार यांनी दिली.
कार्यक्रमाला लवकर जायला शिका : अजितदादांचा चंद्रकांत पाटलांना टोला
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पुणे जिल्हा परिषद पुणे शिक्षण विभाग (प्राथमिक) यांच्यावतीने शिक्षक पुरस्कार व अध्यक्ष चषक पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला अजित पवार हे वेळेवर पोहचले. मात्र, पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे 20 मिनिटे उशिरा आले. तोपर्यंत अजित पवार यांनी आपले भाषण सुरु केले. अजित पवारांचे भाषण सुरू असताना चंद्रकांत पाटील यांची एंट्री झाली. मात्र आपल्या भाषणाच्या शेवटी अजित पवारांनी उशिरा येण्यावरून सगळय़ांसमोर चंद्रकांत पाटील यांना अप्रत्यक्ष टोला लगावला. कार्यक्रमाला लवकर जायला शिका. लवकर वेळेवर उठायला शिका, हा त्यांचा चिमटा चर्चेचा विषय ठरला.